चंद्रपूर: महानगरपालिका क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दर महिन्याला सर्वसाधारण सभा (आमसभा) होणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, चंद्रपूर मनपाच्या महापौर संगीता खांडेकर यांच्याकडून आमसभा घेण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने त्यांची भूमिका सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सध्या केंद्र, राज्य आणि चंद्रपूर महानगरपालिकेतही भाजपची एकहाती सत्ता आहे. सत्तेच्या या त्रिवेणी संगमामुळे शहराचा मोठा विकास होईल अशी चंद्रपूरकरांची अपेक्षा होती. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या आणि नागरिकांच्या या अपेक्षांवर महापौर संगीता खांडेकर यांच्या कार्यपद्धतीमुळे पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहराच्या विकासाबाबत कोणताही मोठा आणि ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
आमसभांची टाळाटाळ महानगरपालिकेच्या नियमानुसार दर महिन्याला आमसभा अपेक्षित आहे. मात्र जून महिन्यात आमसभा घेण्यात आली नाही. त्यानंतर ३ जुलै रोजी आमसभा निश्चित करण्यात आली होती, पण ऐनवेळी महापौरांनी ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता जुलै महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही पुढील सभेबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा हालचाल मनपातून दिसत नाहीये.
प्रलंबित प्रश्न आणि कंत्राटाचा अट्टहास यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाणीटंचाईच्या मोठ्या झळा सोसाव्या लागल्या, ज्यात दिलासा देण्यात महापौर अपयशी ठरल्या. आता पावसाळा सुरू झाल्याने शहरात साथीचे आजार, स्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील ‘अमृत पाणीपुरवठा योजना’ आणि भूमिगत गटार योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवर आमसभेत चर्चा होऊन मार्ग निघणे अपेक्षित होते.
दुसरीकडे, शहरातील कंत्राटी साफसफाईचे कंत्राट ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थेला’ मिळावे यासाठी महापौरांचा अट्टहास असल्याची चर्चा असून यासाठीच वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप होत आहे.
कारणांची बनवाबनवी आणि भाजप नगरसेवकांचीच नाराजी ३ जुलैची सभा रद्द करण्यामागे काँग्रेसच्या गटनेत्याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी हा प्रश्न आता निकाली काढला आहे. त्यामुळे आता सभा न घेण्याचे कोणतेही सबळ कारण उरलेले नाही. सुरुवातीला सभा ‘रद्द’ केल्याचे पत्र काढल्यानंतर आणि त्यावर चहुबाजूने टीका झाल्यानंतर महापौरांनी यू-टर्न घेत सभा केवळ ‘स्थगित’ केल्याची सारवासारव केली.
महापौरांच्या या धरसोड वृत्तीमुळे आणि संदिग्ध भूमिकेमुळे केवळ विरोधी पक्षच नाही, तर सत्ताधारी भाजपचे स्वतःचे नगरसेवकही कमालीचे संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता या महिन्यात आमसभा होणार का? आणि झालीच तर ती जुन्याच अजेंड्यावर होणार की नवीन? याकडे संपूर्ण चंद्रपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.




