चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीला कंटाळून महापालिकेतील दोन उपायुक्तांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य लेखाधिकारी आठवडाभराच्या रजेवर गेल्याने पालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आयुक्तांचा प्रशासनावर वचक राहिला नसून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र असंतोष पसरला असल्याचे चित्र दिसत आहे.

बदलीसाठी अर्जांचा धडाका

मिळालेल्या माहितीनुसार, उपायुक्त शेषराव टाले हे बदलीसाठी इच्छुक असून, त्यांच्या बदलीसाठी राज्यातील एका लोकप्रतिनिधीने नगरविकास विभागाकडे शिफारस केली आहे. दुसरे उपायुक्त संदीप चिद्रवार यांनी तर चंद्रपूर सोडून कुठेही काम करण्याची तयारी दर्शवत स्वतःहून बदलीसाठी अर्ज केला आहे. ‘आता महानगरपालिका नको’ अशा पवित्र्यात हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी असल्याचे समजते.

लेखाधिकारी रजेवर, फायली धूळखात

संत मीराबाई सेवा सहकारी संस्थेच्या चौकशीवरून ‘टार्गेट’वर असलेले मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी हे आठवडाभराच्या सुटीवर गेले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी आपला पदभार कोणाकडेही सोपवलेला नाही. यामुळे महापालिकेतील आर्थिक व्यवहारांसह महत्त्वाच्या कामांचा खोळंबा झाला असून अनेक फायली धूळखात पडल्या आहेत.

अविश्वासाचे वातावरण आणि वादाची पार्श्वभूमी

आयुक्त अकुनुरी नरेश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला कडक शिस्तीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना महानगरपालिकेच्या कामाचा पुरेसा अनुभव नसल्याचे बोलले जात आहे. इराई नदीतील गाळ उपसा कंत्राटावरून झालेल्या वादात आयुक्तांना स्थानिक समितीच्या बैठकीत माफी मागावी लागली होती. आयुक्तांकडून प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जात असल्याने प्रशासनात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ‘अघोषित असहकारामुळे’ येत्या काही दिवसांत चंद्रपूर मनपात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.