नागपूरमधील दर्ग्यात कोलकात्याच्या महिलेवर सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, दर्ग्याच्या बाबासह सहा जणांवर गुन्हा दाखल

नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनी कामठी येथील हुजूर मरियम अम्मा दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला डांबून ठेवून तिला बळजबरीने धर्म बदलण्यासाठी भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी दर्ग्याच्या मुख्य बाबासह त्याच्या अन्य पाच साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील डमडम भागात राहणारी आहे. ती नेहमी श्रद्धेपोटी जुनी कामठी येथील मरियम अम्मा दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येत असे. यावर्षी १८ एप्रिल रोजी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती कामठी येथे आली होती. त्याच रात्री बाबा ताजी जनवीरुद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तिला जबरदस्तीने एका जागी डांबून ठेवले. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देत तिचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला असता, आरोपींनी तिचा विनयभंग केला व पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी या महिलेने अत्यंत शिताफीने स्वतःची तिथून सुटका करून घेतली आणि तातडीने रेल्वे पकडून थेट कोलकाता गाठले. या भीषण प्रसंगामुळे तिला मोठा मानसिक आणि शारीरिक धक्का बसला होता. त्यामुळे कोलकात्याला पोहोचल्यावर तिने एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर तिने स्थानिक डमडम पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बाबा ताजी जनवीरुद्दीन तसेच त्याच्या इतर साथीदारांविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली.

या गुन्ह्यात बाबा ताजी जनवीरुद्दीन, त्याची पत्नी ताजी मुस्तफाफीरुद्दीन फैज, तेजस खोब्रागडे, बशरा फातेमा ताजी आणि मल्ला धुळे यांसह आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचे मूळ घटनास्थळ नागपूरमधील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने डमडम पोलिसांनी हे प्रकरण अधिक तपासासाठी कन्हान पोलिसांकडे वर्ग केले.

कन्हान पोलिसांना बुधवारी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे प्राप्त झाली आहेत आणि त्यांनी सहा जणांवर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपींचे किंवा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नेमका घटनाक्रम कशा पद्धतीने घडला, याची विस्तृत माहिती तपासाअंतीच समोर येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.