नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्किटेक्ट तरुणीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न; पतीसह ५ जणांवर नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल

विशेष विवाह कायद्यान्वये कोर्ट मॅरेज झाल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून सुरू होता शारीरिक व मानसिक छळ; चालू वर्षातील तिसरी खळबळजनक घटना.

नागपूर: शहरात न्यायालयाच्या साक्षीने उच्चशिक्षित तरुण-तरुणीने प्रेम विवाह केल्यानंतर, एका आर्किटेक्ट तरुणीला बळचूर्णी इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध कठोर कायदेशीर गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चालू वर्षात मानकापूर आणि सोनेगावपाठोपाठ नंदनवन परिसरात घडलेली ही तिसरी घटना आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित तरुणी व्यवसायाने आर्किटेक्ट असून ती उच्चशिक्षित आहे. तिचा जुना मित्र तथा २६ वर्षीय अभियंता तरुण हमझा रजा तहसीन रजा याच्यासोबत ती परिचयात होती. यादरम्यान १६ जानेवारी रोजी दोघांनी विशेष विवाह नोंदणी कायद्यानुसार न्यायालयामध्ये कायदेशीर प्रेम विवाह केला. लग्नापूर्वी आपण आपला धर्म बदलणार नाही आणि हिंदू धर्म सोडणार नाही, हे तरुणीने स्पष्ट केले होते. परंतु, विवाहानंतर जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पती हमझा रजा, सासू शाहीना रजा तहसीन रजा, नणंद नबा रजा सोफिया शेख, तसेच मुन्ना शेख आणि इमरान शेख या पाच जणांनी संगनमत करून पीडितेचा छळ चालवला. आरोपींनी तिच्यावर सातत्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तीव्र दबाब टाकण्यास सुरुवात केली.

मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

पीडित तरुणीने वारंवार धर्मांतर करण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या सासरच्या मंडळींनी तिला नंदनवन येथील राहत्या घरी वारंवार अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

बजरंग दलाच्या मदतीने पोलिसांत धाव

सासरच्या मंडळींच्या या रोजच्या त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन न्याय मागण्याचे ठरवले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पीडित कुटुंबियांना पूर्ण विश्वासात घेतले. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेने नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन सर्व प्रकारची आपबीती सांगितली व लिखित फिर्याद दिली.

पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पती हमझा रजा, सासू शाहीना रजा यांच्यासह पाच जणांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार तसेच कौटुंबिक छळाच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या नंदनवन पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.