नागपूर / लातूर: देशातील लाखो होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या महाघोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः नागपूर आणि लातूरमध्ये खोलवर रुजल्याचे सीबीआय (CBI) च्या तपासात उघड झाले आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला पोखरून काढणाऱ्या या रॅकेटमुळे सरकार आणि प्रशासनाच्या नाकाखाली चालणाऱ्या ‘एज्युकेशन माफियांचा’ पर्दाफाश झाला आहे.
नागपूरचा ‘आलोक’ मास्टरमाईंड! सीबीआयच्या तपासात अत्यंत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे की, या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा मुख्य सूत्रधार नागपूरचा ‘आलोक’ नावाचा व्यक्ती आहे. या महाठगाने चक्क पुण्यात सलग १५ दिवस मुक्काम ठोकून राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना पेपरची विक्री केल्याचे समोर आले आहे. प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
लातूरच्या ‘आरसीसी क्लासेस’वर मध्यरात्री छापा! दुसरीकडे, रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धडक कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी क्लासेस’चे (RCC Classes) संचालक प्रा. डॉ. शिवराज मोटेगावकर यांच्या मुसक्या आवळल्या. सीबीआयने मोटेगावकर यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचे जे प्रश्नसंच सापडले, ते थेट ३ मे रोजी झालेल्या ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचे भयानक सत्य उघडकीस आले. या प्रकरणात यापूर्वी परीक्षा प्रक्रियेशी संबंधित मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती, ज्याचे थेट संबंध मोटेगावकर यांच्याशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
९ दिवसांची सीबीआय कोठडी, दिल्लीला रवानगी! अटक करण्यात आलेल्या मोटेगावकर यांना पुण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांचे लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ट्रान्झिट रिमांडवर त्यांना आता पुढील सखोल तपासासाठी थेट दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेले जाणार आहे. या तपासातून राज्यातील आणखी कोणत्या बड्या धेंडांची नावे बाहेर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘लातूर पॅटर्न’ला काळिमा आणि सरकारचे मौन! एकीकडे गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’चे रसायन या घोटाळ्याने पूर्णपणे बिघडवले आहे. “सर, तुम्ही दिलेल्या १०१ प्रश्नांमधूनच पेपर आला…” असे म्हणत विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो या भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत याचा पुरावा देत आहे.
जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि लातूर अशा देशभरातून आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या शिक्षण विभागाला आणि यंत्रणांना या महाघोटाळ्याची भणक कशी लागली नाही? या माफियांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? राज्य सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने तातडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून मुळासकट चौकशी करावी आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी आता विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. या प्रकरणाने संपूर्ण व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे!




