नवी दिल्ली / नाशिक: देशातील लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) पेपरफुटी महाघोटाळ्याच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सीबीआय (CBI) च्या जाळ्यात अडकलेला आरोपी विद्यार्थी अमित मीना याच्या एका फोन कॉलने या संपूर्ण आंतरराज्यीय रॅकेटची पाळेमुळे उखडून काढली आहेत. विशेष आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रातील नाशिक शहरापर्यंत पोहोचले असून, या रॅकेटमध्ये चक्क एमबीबीएसचे विद्यार्थी, बडे कोचिंग क्लासेस आणि दलालांची मोठी साखळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठा भूकंप आणला असून, केंद्र आणि राज्य सरकारने आतातरी झोपेतून जागे होऊन या ‘एज्युकेशन माफियां’वर निर्दयी कारवाई करावी, अशी संतप्त मागणी देशभरातून होत आहे.
तो ‘एक’ फोन कॉल आणि बिंग फुटले! सीबीआय अधिकारी आरोपी अमित मीनाची कसून चौकशी करत असतानाच त्याच्या मोबाईलवर ‘ऋषी’ नावाच्या एका दलालाचा फोन आला. ऋषीने फोनवर थेट विचारले, “अद्याप पैशांचे पेमेंट का झाले नाही?” आणि तो एवढ्यावरच थांबला नाही, तर पुढे म्हणाला, “२०२७ मध्ये मी तुला यापेक्षाही जास्त पैसे कमावून देईन.” हे बेधडक बोलणे ऐकताच तपास अधिकाऱ्यांचे कान टवकारले. ऋषी हा या घोटाळ्याचा केंद्रबिंदू असलेल्या ‘बिवल’ कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आले. याच एका चुकीने या अतिशय संघटित गुन्हेगारीचा भांडाफोड झाला.
५ लाखांत विकत घेतला ‘नीट’चा पेपर! अमित मीनाने सीबीआयसमोर आपला गुन्हा कबूल करत धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने हा पेपर चक्क ५ लाख रुपयांना विकत घेतला आणि नंतर इतर विद्यार्थ्यांना तो चढ्या भावाने विकला. या महाघोटाळ्याचा कट परीक्षेच्या एक महिना आधीच रचण्यात आल्याची संतापजनक माहितीही समोर आली आहे.
नाशिक आणि हरियाणाचे ‘कनेक्शन’: महाराष्ट्रात मोठी खळबळ! सर्वात मोठा खुलासा म्हणजे या रॅकेटचे महाराष्ट्र कनेक्शन! तपासाची चक्रे फिरवत जेव्हा एसओजी आणि सीबीआयचे पथक सवाई माधोपूर येथील एमबीबीएसचा विद्यार्थी विकास बिवल याच्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्याने दोन मोठी नावे ओकली. एक म्हणजे हरियाणातील गुरुग्रामचा यश यादव आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकचा ‘शुभम खैरनार’! आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ सालचा पेपर नाशिकमधूनच लीक झाला होता आणि यंदाच्या (२०२६) पेपरफुटीचे थेट कनेक्शन हरियाणाशी जोडलेले आहे. महाराष्ट्राच्या नाकाखाली हा प्रकार घडत असताना राज्याच्या शिक्षण व गृह विभागाची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? असा संतप्त सवाल आता उपस्थित झाला आहे.
केरळ ते राजस्थान: मुलींच्या हॉस्टेलमध्ये उघड झाले सत्य या पेपरचा प्रवासही एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. हा पेपर सीकरवरून चुरूला आणि तिथून केरळमध्ये शिकणाऱ्या एका एमबीबीएस विद्यार्थ्याकडे गेला. त्या विद्यार्थ्याने हा पेपर सीकरमध्ये मुलींचे ‘पीजी’ (हॉस्टेल) चालवणाऱ्या आपल्या वडिलांना पाठवला. परीक्षा देऊन आल्यावर त्या पीजीमधील विद्यार्थिनींनी जेव्हा मूळ प्रश्नपत्रिका आणि आधी मिळालेला पेपर तपासला, तेव्हा “काका, दोन्ही पेपरमधील प्रश्न अगदी हुबेहूब आहेत!” असे त्यांनी सांगितले आणि या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले.
यानंतर घाबरलेल्या एका कर्मचाऱ्याने राजस्थानमधील ‘गुरुकृपा कोचिंग इन्स्टिट्यूट’ला याची माहिती दिली, मात्र त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व नोकरी खाण्याची धमकी दिली. अखेर ७ मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) अधिकृत तक्रार नोंदवली गेली.
सरकारने आता तरी डोळे उघडावेत! सध्या सीबीआय व्हॉट्सॲप चॅट्स, बँक खाती आणि कॉल रेकॉर्ड्स (CDR) यांची युद्धपातळीवर तपासणी करत आहे. पण प्रश्न असा आहे की, देशाच्या कानाकोपऱ्यात – नाशिक, हरियाणा, राजस्थान, केरळमध्ये हे माफिया निर्ढावलेले असताना सरकार आणि व्यवस्था काय करत होती? गरिबांच्या आणि हुशार मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहायचेच नाही का? या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घेत या सर्व माफियांना त्वरित गजाआड करावे, अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे.




