चंद्रपूर महानगरपालिकेच्या कार्यालयात सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजीचे उग्र आणि धक्कादायक रूप शुक्रवारी पाहायला मिळाले. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये महापालिकेच्या आवारातच जोरदार राडा झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर काही वेळातच हाणामारी आणि धक्काबुक्कीत झाल्याने मनपा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वादाची ठिणगी नेमकी कशी पडली? शुक्रवारी दुपारी चंद्रपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, संभाव्य कायदेशीर पेचप्रसंग टाळण्यासाठी महापौर संगीता खांडेकर यांनी एक दिवस आधीच म्हणजेच गुरुवारी ही सभा अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबतच्या एका विषयावर स्थगिती दिली आहे. याच कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली.
जोरगेवार समर्थकांचे आंदोलन सभेच्या या अचानक रद्दीकरणामुळे आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील नगरसेवक प्रचंड आक्रमक झाले. कोणत्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून संपूर्ण सभा रद्द करण्यात आली? असा जाब विचारत या नगरसेवकांनी थेट आयुक्त अनुकुरी नरेश यांच्या कक्षात धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच नगरसचिवांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. यानंतर संतापलेल्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर भजन करत अनोख्या पद्धतीने आपल्याच पक्षाच्या महापौरांविरोधात जोरदार निदर्शने केली.
नेते आमनेसामने अन् राडा याच गोंधळाच्या आणि तणावाच्या वातावरणात सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे नगरसेवकही मनपा कार्यालयात पोहोचले. यावेळी दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आल्याने वादाची ठिणगी पडली. बघता बघता दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली. या धक्काबुक्कीमुळे मनपा कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना तातडीने मध्यस्थी करावी लागली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आली.
या अभूतपूर्व घटनेमुळे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि सुप्त कलह आता थेट चव्हाट्यावर आला आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला हा वाद आता दोन प्रभावी नेत्यांच्या समर्थकांमधील हाणामारीपर्यंत पोहोचल्याने, आगामी काळात ही गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.




