मतदार यादी दोषरहित करा, मतदान अनिवार्यतेवर कायदेशीर विचार व्हावा – मुनगंटीवार यांची निवडणूक आयोगाला मागणी
चंद्रपूर –मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे ठाम प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मला मतदानाचा हक्क मिळाल्यापासून आजपर्यंत मी सातत्याने मतदान करतो आहे. माझ्या पत्नीनेही आपले कर्तव्य बजावले आहे.” मुनगंटीवार म्हणाले की, “हे शहर आपले आहे – तुमचे, माझे आणि जनतेचे. या शहराचा विकास व्हावा यासाठी योग्य मतदान होणे अत्यंत गरजेचे आहे.” जनतेवर त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त करत, नागरिक योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदार यादीतील गोंधळावर टीका
राज्यातील एका मंत्र्याचेच नाव मतदार यादीत नसणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, सामान्य मतदारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते.
“जे लोक देशासाठी प्राण देतात, त्याच भावनेतून मतदार तासन्तास रांगेत उभे राहतात. त्यांना सलाम केला पाहिजे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
निवडणूक आयोगाने क्रांतिकारी निर्णय घ्यावेत
मतदान अनिवार्य करण्याबाबत कायदेशीर शक्यता तपासावी, तसेच मोबाईल लिंक डेटा वापरून मतदाराला त्याचे मतदान केंद्र, खोली व ठिकाण मोबाईलवर पाठवण्याची व्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली.
हजारो कोटी खर्च, पण मतदार अस्वस्थ
2024 च्या निवडणुकांवर साडेपाच हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले, “इतका खर्च करूनही नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क वापरता येत नसेल, तर ही गंभीर बाब आहे.”
राष्ट्रीय मतदार जागृती दिन 25 जानेवारी – फक्त कागदावर नको
राष्ट्रीय मतदार जागृती दिन (25 जानेवारी) फक्त औपचारिक न राहता ग्राउंड लेव्हलवर प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे सांगून त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात दोषरहित मतदार यादीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.




