महाजेनकोमध्ये नियमबाह्य निविदांचा सुळसुळाट: अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून कोट्यवधींची लूट उघड

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये (महाजेनको) उच्चपदस्थ अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे मिळावीत आणि त्यातून मोठे कमिशन लाटता यावे, यासाठी निविदा प्रक्रियेत अनावश्यक जाचक अटी टाकून वाढीव दराने कंत्राटे दिली जात असल्याचा प्रकार चंद्रपूर आणि भुसावळ येथील वीज केंद्रांमध्ये उघडकीस आला आहे.

निविदा प्रक्रियेतील फेरफार महाजेनकोच्या अधिकाऱ्यांकडून ‘प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर’ (पीएलसी – PLC) सारख्या अटी जाणीवपूर्वक निविदेत समाविष्ट केल्या जातात. याचा मुख्य उद्देश निविदेची रक्कम वाढवणे आणि विशिष्ट कंत्राटदारांचा फायदा करून देणे हा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुसावळ वीज केंद्रातील संशयास्पद कंत्राट

  • भुसावळच्या दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक ६ मधील ‘कोल मिल्स रिजेक्ट हँडलिंग सिस्टीम’च्या कामासाठी पीएलसीची अट टाकण्यात आली होती.
  • केवळ सहा महिन्यांच्या या कामासाठी तब्बल १ कोटी ४७ लाखांचे कंत्राट काढण्यात आले.
  • राज्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांच्या लक्षात हा गैरप्रकार आल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्य अभियंत्यांची बदली केली.
  • विशेष म्हणजे, याच कामासाठी नंतर काढण्यात आलेल्या १२ महिन्यांच्या कंत्राटाची किंमत केवळ ६९ लाख ३६ हजार १०० रुपये इतकी होती. यावरून या कामात किती मोठी तफावत होती हे लक्षात येते.

चंद्रपूर वीज केंद्रात कोट्यवधींची तफावत

  • चंद्रपूर वीज केंद्रातील संच क्रमांक ८ आणि ९ (प्रत्येकी ५०० मेगावॅट) मध्ये दाबयुक्त एअरक्लोज कोळसा हाताळणी प्रणालीसाठी पीएलसीची अट टाकून तब्बल ५ कोटी ९९ लाख ५७ हजार ४८० रुपयांचे कंत्राट ‘एबीयू’ (ABU) नावाच्या कंपनीला देण्यात आले.
  • दुसरीकडे, अशाच प्रकारच्या संच क्रमांक ५ आणि ६ मधील कामासाठी पीएलसीची अट न ठेवता केवळ ६५ लाख ५८ हजार २५१ रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
  • दोन्ही कंत्राटांचा कालावधी दोन वर्षांचा असतानाही, त्यांच्या दरातील तफावत कोट्यवधींच्या घरात आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, पीएलसीची अट घालूनही कंत्राटदाराने ती प्रणाली कार्यान्वित केली नसून काम जुन्या पद्धतीनेच (मॅन्युअली) सुरू असल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच चंद्रपूर वीज केंद्राची पाहणी केली. एबीयू कंपनीकडून काम सुरू असतानाच संच ८ आणि ९ मध्ये बॉयलर ट्यूब लीकेज झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत केवळ दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कोट्यवधींची लूट करणारे कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे महाजेनकोचे व्यवस्थापन नक्की काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.