चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यप्रणालीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीत विकासाची मोठी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे खरे वास्तव आता आकडेवारीतून उघड झाले असून, चंद्रपूरकरांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीच्या (MPLAD) वापराबाबत धानोरकर यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे.
निधी मंजूर, पण विकास कुठे? अधिकृत अहवालानुसार, खासदार धानोरकर यांना खासदार निधीअंतर्गत १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, या भरघोस निधीपैकी आतापर्यंत विकासकामांवर केवळ ७८ लाख ३० हजार रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, एकूण उपलब्ध निधीपैकी अवघा ५.३ टक्केच निधी खर्च झाला आहे. याहूनही संतापजनक बाब म्हणजे त्यांच्या खात्यावर तब्बल १९ कोटी ९० लाख रुपयांचा मोठा निधी अद्यापही पडून असून तो अक्षरशः धूळ खात आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्याला रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांची नितांत आवश्यकता असताना एवढा मोठा निधी वापराविना पडून राहिल्याने प्रशासकीय यंत्रणा आणि खासदारांच्या इच्छाशक्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
७० पैकी केवळ १ काम पूर्ण खासदारांच्या कार्यपद्धतीवरील सर्वात मोठी टीका त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे होत आहे. खासदार धानोरकर यांनी आतापर्यंत एकूण ७० विकासकामांची शिफारस केली होती. मात्र, प्रशासकीय लालफितीचा कारभार आणि पाठपुराव्याचा अभाव यामुळे या ७० पैकी फक्त १ काम पूर्ण होऊ शकले आहे. उर्वरित ६९ कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. कामे पूर्ण होण्याचे हे प्रमाण केवळ १.४ टक्के इतकेच आहे.
या शिफारशींमध्ये २०२४ सालातील ३७ लाखांच्या ४ कामांचा, २०२५ मधील ७.५ कोटी रुपयांच्या ५७ कामांचा आणि २०२६ मधील १.५ कोटी रुपयांच्या ९ कामांचा समावेश होता. या सर्व प्रस्तावित कामांपैकी केवळ घाटंजी तालुक्यातील अकोला बाजार ते सावळी या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झालेल्या या एकमेव कामासाठी १९.७० लाख रुपये खर्च आला. याव्यतिरिक्त मतदारसंघाच्या पदरात काहीही पडलेले नाही. अहवालानुसार, ५८.७० लाख रुपयांची बिले सध्या प्रक्रियेत असली तरी, यामध्ये ७४.९ टक्के एवढा मोठा पेमेंट गॅप आहे. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वयाचा पूर्ण अभाव असल्याचे स्पष्ट होते.
विरोधकांना मिळाले आयते कोलीत रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारख्या पायाभूत सोयींसाठी हा हक्काचा निधी वापरणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होऊनही खासदारांचे हे ‘प्रगतीपुस्तक’ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निधी पडून राहिल्याने आगामी काळात चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे असून विरोधकांना या निमित्ताने आयते कोलीत मिळाले आहे. ‘फक्त घोषणाबाजी नको, तर जमिनीवर काम हवे’, अशी संतप्त प्रतिक्रिया आता सामान्य नागरिकांमधून उमटत असून प्रशासनाशी योग्य समन्वय साधून प्रलंबित ६९ कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.




