चंद्रपूर : राज्यातील शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी चंद्रपूर ला यावा यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, त्यासाठी महायुती च्या हाती सत्ता द्यावी लागेल, मात्र दलालांच्या हाती सत्ता गेला विकास खुंटल्याशिवाय राहणार नाही असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन करून विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ४ जानेवारी रोजी अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पालकमंत्री अशोक उईके, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया, देवराव भोंगळे, करण देवतळे, शिवसेनेचे किरण पांडव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले. ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीसुद्धा संवाद साधला. राज्यात महायुतीचे सरकार अस्तीत्वात आहे. युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना न्याय देणे कठीण आहे. २० पदे सहयोगी पक्षांना द्यावी लागली. त्यामुळे पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करावा लागला. परिणामी, चंद्रपूरला मंत्रीपद मिळाले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात कोणताही वाद नाही. मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या दोन नेत्यांमुळे पक्षात असलेल्या तानतनावावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही वर्षांत सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर आणि किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहराचा चेहरमोहरा बदलला आहे. या तीन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला. दिक्षाभूमी आणि महाकाली मंदिराच्या विकासासाठीसुद्धा कोट्यावधीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी चंद्रपूरला येणे अपेक्षित आहे. परंतु, महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हातात गेली तर विकास होणार नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन करतानाच चंद्रपूर हे शहर आधुनिक विकासाचे शहर बनवू. महानगरपालिका निवडणुकीत युतीचाच भगवा फडकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. १५ तारखेला आमची काळजी घ्या. १६ तारखेपासून सरकार तुमची काळजी घेईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत राज्यात ६६ बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेच्या कोर्टात आम्ही जिंकलो आहे. त्यामुळे कोण कुठे जाते, याची चिंता नाही.




