१५–२० फूट फुटपाथ गिळंकृत, खुलेआम धुम्रपान; नियम धाब्यावर बसवून खासगी ट्रॅव्हल्सची दहशत
नागपूरच्या हृदयस्थानी असलेले छत्रपती चौक बसस्थानक सध्या प्रवाशांसाठी नव्हे तर अतिक्रमण, धुम्रपान आणि बेकायदेशीर वाहतुकीचे केंद्र बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसस्थानकाच्या समोरचा १५ ते २० फूट रुंदीचा संपूर्ण फुटपाथ खासगी ट्रॅव्हल्स व दुकानदारांनी अक्षरशः गिळंकृत केला असून, पादचाऱ्यांना थेट रस्त्यावर उतरावे लागत आहे — आणि इथेच सुरू होते अपघातांची मालिका!
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी असतानाही बसस्थानक परिसरात तरुण-तरुणींची टोळकी खुलेआम सिगारेट ओढताना दिसत आहेत. याच ठिकाणी उभ्या असलेल्या गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य धोक्यात तर आहेच, पण लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, शासनाच्या नियमांनुसार बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी ट्रॅव्हल्स व टप्पा वाहतुकीस बंदी आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभ्या करून प्रवासी भरले जात आहेत, वाहतूक ठप्प होत आहे आणि छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत.
इतक्यावरच न थांबता, या ट्रॅव्हल्स चालकांकडून नागरिकांशी अरेरावी, उद्धट भाषा आणि दमदाटी केली जात असल्याचेही समोर आले आहे. तक्रार केली तर उलट धमकावले जाते, असा संतापजनक आरोप स्थानिकांनी केला आहे.

या सगळ्या गोंधळात महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि प्रशासन नेमके कुठे आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
बसस्थानक की बेकायदेशीर अड्डा?
नियम फक्त कागदावरच का?
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ अतिक्रमण हटवा, धुम्रपानावर कठोर कारवाई करा आणि बेकायदेशीर ट्रॅव्हल्सवर बंदी घाला, अशी ठाम मागणी केली आहे.
अन्यथा, छत्रपती चौक बसस्थानकात घडणारा पुढचा अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाची किंमत ठरू शकतो!



