पिंपरी चिंचवड, हडपसर, कोथरूड, निगडी, वडगाव शेरी, धनकवडीसह उपनगरांतील प्रवाशांसाठी पहाटेची धावपळ
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पुणे (रेल्वे स्थानक) ते अजनी (नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही एक्स्प्रेस पुणे आणि नागपूर दरम्यानचे जवळपास १२ तासांचे अंतर आरामदायी आणि आधुनिक पद्धतीने पार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. परंतु, पुण्याहून सुटण्याची सकाळी ६.२० वाजताची वेळ ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पिंपरी चिंचवड, हडपसर, कोथरूड, निगडी, वडगाव शेरी, धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज, वाकड, बावधन आणि इतर उपनगरांमधून लवकर सकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना पहाटे ४ वाजण्यापूर्वीच घराबाहेर पडावे लागणार आहे. विशेषतः कामकाजाच्या दिवशी ही वेळ अनेकांसाठी अवघड ठरत असून, ‘सुविधा असूनही वेळ अनुकूल नाही’ अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, ही गाडी पुण्याहून सकाळी ६:२० वाजता सुटून सायंकाळी ६:२० वाजता अजनीला (नागपूर) पोहोचेल. परतीच्या प्रवासात, अजनीहून सकाळी ९:२० वाजता सुटून रात्री ९:२० वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीत एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि सात चेअर कार असे एकूण ८ डबे असून ५९० प्रवाशांची क्षमता आहे.
भाड्यांबाबत बोलायचे झाल्यास, एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ₹३८१५ तर चेअर कारसाठी ₹२१४० आकारले जात आहेत. दोन्ही भाड्यांमध्ये भोजन सुविधा समाविष्ट आहे. भोजन नको असल्यास प्रवाशांना अनुक्रमे ₹५४५ इतकी सवलत मिळू शकते.

विशेष म्हणजे, पुण्यात स्थायिक झालेले नागपूरचे नागरिक आणि पुण्यात शिकणारे विद्यार्थी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना वेळ बदलण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सकाळी ६.२० वाजताची गाडी बहुतेकांना गाठता येत नाही, त्यामुळे सुटण्याची वेळ किमान ७:३० किंवा ८ वाजता करावी, जेणेकरून प्रवाशांची संख्या वाढेल आणि सुविधा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
रेल्वे प्रशासनाने ही वेळ नागपूर-पुणे प्रवाशांच्या सोयीसाठी ठरवली असली तरी पुणे शहरातील विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे स्थानकावर वेळेत पोहोचणे मोठे आव्हान ठरत आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि व्यापारी केंद्रांमधील संपर्क अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने वंदे भारत एक्स्प्रेस महत्त्वाची पायरी मानली जात असली तरी, वेळेचा अडथळा प्रवासी संख्येवर परिणाम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.




