नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. फडणवीसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या प्रतिक्रियेचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धर्मवीर 1 चित्रपटाने दिवंगत आनंद दिघे यांचे प्रेरणादायी जीवन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कमी माहिती असलेले आयुष्य लोकांपर्यंत पोहोचवले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या राजकीय भूकंपामुळे धर्मवीर 2 ची मागणी वाढली होती.”
फडणवीसांनी पुढे मिश्किल टिप्पणी केली, “जेव्हा धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन.” या विधानामुळे चर्चेला उधाण आले असून, धर्मवीर 3 मध्ये काय दाखवले जाणार आणि कोणाच्या आयुष्यावर आधारित असेल, याची चर्चा रंगू लागली आहे.
संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, “फडणवीसांना धर्मवीरांची व्याप्ती माहीत नाही. त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढला पाहिजे, कारण नवीन औरंगजेब आणि अफझलखान महाराष्ट्र लुटायला येत आहेत.”
राऊतांच्या मते, चित्रपटांच्या माध्यमातून नवीन प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु आनंद दिघेंप्रमाणे शिवसेनेप्रती निष्ठा ठेवणे महत्त्वाचे आहे.