चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजप शहराध्यक्ष पदावरून नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार प्रभाग क्रमांक १ मधील रामकृष्ण सोसायटी परिसरात घडला असून, येथे सर्वच प्रमुख पक्षांचे प्रचार होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी भाजपचे होर्डिंग असून, विशेष म्हणजे फक्त सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रतिमेवरच शेण फेकण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार मुद्दाम आणि लक्षपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली असता, हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवारांच्या यादीतील तब्बल १७ उमेदवार बदलण्याची धाडसी (आणि वादग्रस्त) कृती सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली होती. या निर्णयामुळे पक्षात मोठा गदारोळ माजला आणि अखेर भाजप नेतृत्वाने त्यांची शहराध्यक्ष पदावरून तात्काळ हकालपट्टी केली होती.
या उमेदवार बदलामुळे ज्यांची नावे यादीतून वगळली गेली, त्या अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळेच होर्डिंगवर शेण फेकण्याची ही कृती त्या राजकीय रागातून आणि सूडबुद्धीने करण्यात आली असावी, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची प्रतिमा आणखी डागाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसली तरी, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने लवकरच आरोपींचा शोध लागण्याची शक्यता आहे. पोलिस यंत्रणाही घटनेची माहिती घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.




