चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद तीव्र झाला आहे. काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांनी धानोरकर गटाला डावलत स्वतःसह वडेट्टीवार गटातील सात नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान दिल्याचा आरोप होत आहे. या निर्णयामुळे सभागृहातच काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तीव्र शब्दिक वाद झाला आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली असून, धानोरकर गटाने राजेश अडूर यांच्या पक्षातून तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी पत्रकार परिषद घेऊन अडूर यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली.
काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला वाद अजूनही कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यानही दोन्ही गटांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परिणामी, काँग्रेसकडे २७ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही पक्षाला सत्तेबाहेर राहावे लागले.
राजकीय निरीक्षकांच्या मते, राज्यात भाजपाचे वर्चस्व असताना चंद्रपूरमध्ये मात्र वेगळे राजकीय चित्र दिसून आले. मतदारांनी काँग्रेसला मतदान केले असतानाही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता हातातून गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरीदेखील दोन्ही गटांमधील संघर्ष कमी होताना दिसत नाही.
प्रदेश नेतृत्वाने गटबाजी थांबवण्यासाठी गटनेतेपदी वडेट्टीवार गटातील नगरसेवक राजेश अडूर यांची नियुक्ती केली होती. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना काँग्रेसचे सर्व २७ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे सर्व नगरसेवकांना समान संधी देण्याची नैतिक जबाबदारी अडूर यांच्यावर असल्याचे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थायी समितीत धानोरकर गटाला तीन आणि वडेट्टीवार गटाला चार सदस्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांनी अॅड. राहुल घोटेकर, संगीता अमृतकर आणि संगीता भोयर ही तीन नावे राजेश अडूर यांच्याकडे पाठविल्याचा दावा केला आहे. मात्र, अडूर यांनी ही नावे वगळून वडेट्टीवार गटातील सात नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे दिली. सभागृहात लिफाफा उघडल्यानंतर ही नावे जाहीर होताच काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी अडूर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत बोलताना संतोष लहामगे यांनी आरोप केला की, पक्षातील गटबाजी संपवण्याचे प्रयत्न सुरू असताना काही नगरसेवक जाणीवपूर्वक पक्षात फूट पाडण्याचे काम करत आहेत. अडूर यांनी निष्ठावंत नगरसेवकांना डावलून पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची गटनेतेपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी महापौर संगीता अमृतकर यांनीही अडूर यांच्यावर टीका करत सांगितले की, गटनेता म्हणून सर्व नगरसेवकांची बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र तसे करण्यात आले नाही. एकाच वार्डातून दोन सदस्यांना स्थायी समितीत स्थान देण्यात आले असून आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवून निर्णय घेतला गेला. अशा प्रकारची मनमानी भविष्यात सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राजेश अडूर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रदेशाध्यक्षांकडून कोणतीही अधिकृत यादी आपल्याला प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. वेळेअभावी सात नावे लिफाफ्यात बंद करून महापौरांकडे दिली, असे अडूर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे २७ नगरसेवक असून पुढील टप्प्यात इतर नगरसेवकांनाही संधी दिली जाईल, त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपातही नाराजी
महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेचे एकत्रित संख्याबळ २४ आहे. या संख्याबळाच्या आधारावर भाजपाला स्थायी समितीत सहा सदस्य मिळाले आहेत. मात्र या सहा जागांवरून भाजपामध्येही दोन गटांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. मुनगंटीवार गटाला दोन तर जोरगेवार गटाला चार सदस्य मिळाल्याची चर्चा आहे. सुरुवातीला प्रज्वलंत कडू, रवी लोनकर आणि सुनीता जयस्वाल यांची नावे चर्चेत होती. मात्र अंतिम यादीत रवी लोनकर आणि सुनीता जयस्वाल यांची नावे वगळण्यात आल्याने त्यांनी सभागृहातच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपामध्येही अंतर्गत असंतोष असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नवनियुक्त स्थायी समिती सदस्य (१६)
काँग्रेस :
राजेश मुरली अडूर, वसंत राजेश्वर देशमुख, चंदा मनोज वैरागडे, संजीवनी राजू वासेकर, सचिन विनोद कत्याल, खान साफिया तवंगर खान, विनोद हरीश्चंद्र लभाने
भाजपा :
सुभाष दिनकर कासनगोडूवार, संजय नारायण कंचर्लावार, पुष्पा संजय उराडे, सारिका सचिन संदूरकर, प्रज्वलंत प्रमोद कडू, सविता प्रलय सरकार
उबाठा :
मनस्वी संदीप गिन्हे, श्रुती राकेश घटे
भाशेकाप :
प्रदीप शंकर देशमुख




