नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील भरतीत मोठा घोळ, डॉ. अनिल मुसळे यांना शिक्षण विभागाचा दणका
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी आता चक्क मुख्याध्यापकाचीच नियुक्ती बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत सिद्ध झाले आहेत मुख्याध्यापक डॉक्टर अनिल मुसळे यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव 7 दिवसात सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. काही दिवसापूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी योगिता कुडमेथे व संस्थेचे सचिव मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे या दोघांवरही शिक्षिकेची बोगस भरती प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली होती
सविस्तर वृत्त असे की, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा द्वारा संचलित श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, नांदा या शाळेचे मुख्याध्यापक पदी डॉ.अनिल रामचंद्र मुसळे रुजू होण्यापूर्वी ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर येथील मुख्य शाखेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापकपदी रुजू व्हायचे असल्याने त्यांनी दिनांक ७ फेब्रुवारी २०१० ला लिखित राजीनामा बँकेकडे सादर केला असे मुसळे यांचे म्हणणे आहे बँकेच्या प्रक्रियेनुसार संचालक मंडळांनी तो ८ जून २०११ ला मंजूर करून त्यांना सेवेतून सेवामुक्त केले. मात्र बँकेतून सेवा मुक्त व्हायच्या अगोदरच १८ मार्च २०१० ला मुसळे यांनी मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारला. १८ मार्च २०१० ते ८ जून २०११ पर्यंत ते बँकेच्या सेवेत कार्यरत होते. त्यामुळे अनिल मुसळे यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतरही मुसळे यांनी सेवेतून मुक्त होईपर्यंत सतत १५ महिने बँकेकडून वेतन उचलले. त्यामुळे ८ जून २०११ पर्यंत ते बँकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असल्याचे सिद्ध झाले.
बोगस प्रमाणपत्र जोडून वाढवला अनूभव
मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी किमान पाच वर्ष सहाय्यक शिक्षकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मुसळे यांनी तुकडोजी महाराज विद्यालय भालर, भास्करराव ताजने माध्यमिक विद्यालय कळमना, गुलाब नबी आझाद ज्युनिअर कॉलेज बार्शी या तीन शाळांचा ५ वर्षाचा अनुभव खुलासा करताना जोडला. मात्र चौकशी अंती एकाही ठिकाणी त्यांच्या पदाला वैयक्तिक मान्यता प्राप्त नसल्याचे आढळून आले. यावरून अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याचे अहवालात म्हटले आहे.
संचालकांवरही टांगती तलवार
शिक्षण विभागाचे अधिकारी हे संस्थेचे पदाधिकारी व संचालकांवर विश्वास ठेवून शाळेसंदर्भात कार्यवाही करीत असतात. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा या संस्थेने शासनाची दिशाभूल केली असून १४ वर्षांपूर्वी झालेली नियुक्ती अवैध असल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्याध्यापक बोगस नियुक्ती प्रकरणात संस्थेलाही तेवढेच जबाबदार समजण्यात येत आहे.
अध्यक्षांच्या बनावट सह्या
अहवालात प्रत्येक सभेच्या ठरावावर व कर्मचारी नियुक्त्यांवर अध्यक्षांच्या बनावट सह्या मारल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमीकेकडे संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
शिक्षक पद भरतीची चौकशी करण्याची गरज
प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे हे संस्थेचे सचिव आहे सचिव पदाचा गैरफायदा घेऊन बनावट दस्ताऐवज तयार करून त्यांनी स्वतःची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करून घेतली याच शाळेतील बोगस शिक्षिका भरती प्रकरण काही दिवसापूर्वी उघडकीस आले होते व या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे मुख्याध्यापकाची निवड बोगस असल्याने आणखी शिक्षकांची बोगस निवड करण्यात आल्याचा आरोप होत आहे शासनाने या शाळेच्या पदभरतीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी होत आहे
मी स्वतः संस्था अध्यक्ष असून नियुक्त्या व ठरावावर माझ्या बनावट सह्या मारलेल्या आहे. विविध बँकांमध्ये १४ खाती उघडली आहे. यामधून मोठी आर्थिक अफरातफर झाल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येक ठिकाणी माझ्या बनावट सह्यांचा दुरुपयोग केलेला असून संपूर्ण संचालक मंडळांना अंधारात ठेवण्यात आले आहे. स्वतः मुख्याध्यापक व संस्थेचा सचिव असल्याने प्रत्येक गोष्ट संचालक मंडळाला अंधारात ठेवून करण्यात आली आहे. अंतिमत: गैरप्रकार उघडकीस आला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच संस्थेची मागणी आहे.
सुनीता लोढीया
अध्यक्ष, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा