रामनगर पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप / पोलीस शिपाई विनोद यादवची तडकाफडकी मुख्यालयात बदली
चंद्रपूर : रामनगर पोलीस हे शिवा वझरकर हत्या प्रकरणातील आरोपींना बिर्यानी खाऊ घालत आहेत, तसेच त्यांना इतरही मदत करीत असल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे यांच्याकडून तपास काढून घेतला असून, आता हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (एलसीबी) सोपविला आहे. त्यामुळे शिवा वझरकर हत्या प्रकरणात आणखी काही नवे धागे गवसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोपींना मदत करीत असल्याच्या आरोपावरून रामनगरचा पोलीस शिपाई विनोद यादव यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र आनंदीआनंद वातावरण होते. प्रजासत्ताकदिनाची तयारी करण्यात अनेकजण व्यस्त असताना २५ जानेवारीच्या रात्री शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर युवासेना अध्यक्ष शिवा मिलिंद वझरकर याची ठाकरे गटाच्याच वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल चंद्रकांत काशीकर, हिमांशू कुमरे, चैतन्य आसकर, रिझवान पठाण, नासीर खान, रोहीत पितरकर, सुमित दाते आणि अन्सार खान यांनी मिळून निर्घृणपणे हत्या केली. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची राजकीय पक्षाच्याच वाळूमाफियाकडून हत्या झाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. शिवा वझरकरच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण केले असून, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. गोंडपिपरी येथील कुलथा वाळूघाट प्रकरणातील आरोपी स्वप्निल काशीकर, हिमांशू कुमरे आणि त्यांच्या साथीदारांना अटकपूर्व जामीन मिळालाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
दादागिरीतून अवैध धंदे चालविण्यासाठी काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी पैशााचे आमिष दाखवून महाविद्यालयीन तरुणांचा वापर करीत असल्याचेही या प्रकरणातून पुढे आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २८ जानेवारी रोजी शिवाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्र्यांना पोलीस प्रशासनाच्या एकूणच भूमिकेवर संशय आला. सुरुवातीला या हत्या प्रकरणाचा तपास रामनगर ठाण्यातील कोणत्या अधिकाऱ्याकडे द्यायचा, असाच प्रश्न होता. कोणीही अधिकारी तपास घ्यायला तयार नव्हते. हत्या प्रकरणाचा तपास सहसा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जातो. मात्र, रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे यांनी हा तपास चंद्रपुरात नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक कपिल केकाडे यांच्याकडे सोपविला. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना ४८ तासांत अटक करण्याात आली. पण, सर्व आरोपींना मदत केली जात असल्याचा आरोप शिवाच्या नातेवाईकांनी केला आहे. रामनगर ठाण्यातील पोलीस शिपाई विनोद यादव हे आरोपींना बिर्यानी खाऊ घालत आहेत, तसेच आरोपींना सर्वतोपरी मदत करीत असल्याची ऑडीओ क्लीप पालकमंत्र्यांना ऐकवण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी लगेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुनगंटीवार यांनी परदेशी यांची कानउघाडणीही केली. त्यानंतर पोलीस शिपाई विनोद यादव यांची रामनगर ठाण्यातून तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. तसेच तपासही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा तपास सोपविण्यात आल्याने आणखी काही नवे धागेदोरे गवसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- कलम १२० ब न लावल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय
शिवा वझरकरची हत्या कट रचून करण्यात आली असताना पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १२० ब भादंविचा गुन्हा का लावला नाही, असाही प्रश्न मिलिंद वझरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपस्थित केला. रामनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध ही कलम न लावून आरोपींना एकप्रकारे मदतच केल्याचा आरोप शिवाचे वडील मिलिंद वझरकर यांनी केला आहे. - आरोपींचा पुन्हा पीसीआर मागणार
शिवा वझरकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आठही आरोपींची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे सर्व आरोपींना मंगळवारीच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या हत्या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला आहे. त्यामुळे आरोपींची कसून चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.