शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन.

नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. तसेच डॉ.हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

“नागपूरमध्ये प्रतिवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात मी रेशीमबागेत येऊन भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेत असतो. येथे आल्यावर ऊर्जा मिळते. संघ मुख्यालयात येणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये काहीच राजकरण नाही. आमचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आहे,विकासाचं हिंदुत्व आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत”, असं शिंदे म्हणाले.

“आमचं सरकार सर्व सामान्य माणसाचं सरकार आहे. सर्व सामान्य माणूस कधीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असं आमचं सरकार आहे. जनतेच्या सेवेची प्रेरणा येथून घेऊन काम करत आहोत. आम्ही देशाला काय देणार, हा विचार डॉ.हेडगेवार यांनी दिला”, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिभवन परिसराला भेट देताना त्यांच्याबरोबर शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. तर याआधी भाजपच्या सर्व आमदारांनी रेशीमबागेत जाऊन स्मृती मंदिर परिसरात डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.