बहुमत अपुरं… पण डाव जबरदस्त! २४ वरून ३४ चा पल्ला गाठत मुनगंटीवारांनी घडवला राजकीय चमत्कार

चंद्रपूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत जे घडलं, ते एखाद्या राजकीय थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असं आहे. बहुमताचा आकडा ३४… आणि भाजपकडे अवघे २४ नगरसेवक! समीकरणं स्पष्ट होती महापौर पद दूरचं स्वप्न. पण जिथे गणित संपतं, तिथून राजकारण सुरू होतं… आणि त्या रंगमंचावर नायक म्हणून उभे राहिले सुधीर मुनगंटीवार.

महापालिका निवडणुकीपासूनच भाजपमध्ये गटबाजीचा ज्वालामुखी धुमसत होता. एबी फॉर्म प्रकरण, उमेदवारी कापणे, अंतर्गत कुरघोड्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपचे केवळ २३ नगरसेवक विजयी. मित्रपक्षाकडून फक्त एक. आकड्यांचा खेळ पाहता काँग्रेस ३२ वरून ३४ पर्यंत सहज पोहोचू शकत होती. भाजपसाठी मात्र २४ वरून ३४ हा ‘मिशन इम्पॉसिबल’च!

पण इथेच सुरू झाला ‘किंगमेकर’चा खेळ.

मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून संगीता खांडेकर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळवून देण्यापासून ते शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि अपक्ष नगरसेवकांशी सलग २५ दिवस संपर्क ठेवण्यापर्यंत मुनगंटीवारांनी एक-एक चाल अचूक रचली. रात्रीचे फोन, बंद दरवाज्यांमागील चर्चा, आणि तासागणिक बदलणारी समीकरणं चंद्रपूरमध्ये राजकीय तापमान शिगेला पोहोचलं होतं.

८ आणि ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक निर्णायक प्रस्ताव समोर आला सव्वा-सव्वा वर्ष महापौर पद भाजप आणि शिवसेना विभागून घेणार, उपमहापौर पद पाच वर्ष सेनेकडे, तर स्थायी समितीचे दोन वर्ष अध्यक्षपद. हा प्रस्ताव म्हणजे गेमचेंजर!

दरम्यान, मुनगंटीवार जबलपूर येथे कौटुंबिक विवाहसोहळ्यात होते. पण फोनची लाईन सतत गरम होती. राजकारणाचा धागा त्यांच्या हातातून सुटला नव्हता. काँग्रेसकडूनही सेनेला प्रस्ताव गेला; मात्र महापौर पद सोडण्यास अनिच्छुक भूमिकेमुळे समीकरणं अडकली. नेमका तोच क्षण पकडत मुनगंटीवारांनी आपला प्रस्ताव ठामपणे पुढे रेटला.

महापौर निवडणुकीच्या काही तास आधी, एका वाहनात ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भाजप आणि शिवसेना यांच्यात लेखी करार झाला. स्वाक्षऱ्या झाल्या… आणि चंद्रपूरच्या राजकारणात इतिहास घडला.

बहुमत नसताना भाजपचा महापौर बसवणे हा केवळ राजकीय डाव नव्हता, तर रणनीती, संयम आणि नेतृत्वाचा परिपाक होता. संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या, आणि मुनगंटीवारांनी पक्षातील विरोधक तसेच काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांनाही चकवा दिला.

चंद्रपूरच्या राजकीय रंगभूमीवर आज एकच चर्चा आहे
“ही निवडणूक कोण जिंकली?”

उत्तर स्पष्ट आहे.
महापौर जिंकले भाजपचे…
पण ‘किंगमेकर’ ठरले सुधीर मुनगंटीवार. 👑