धानोरकरांनी ‘मालक’ असल्यासारखं वागू नये, वडेट्टीवारांचा थेट इशारा
चंद्रपूर | प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. “खासदार असल्या तरी जिल्ह्याच्या मालक नाहीत,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केल्याने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, प्रतिभा धानोरकर यांनी काही नगरसेवकांना जबरदस्तीने वाहनात बसवून घरी नेले. “अनेक नगरसेवकांनी मला स्वतः फोन करून ही माहिती दिली आहे. दोन-चार अपवाद वगळता बहुतांश नगरसेवक माझ्या बाजूने आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “चार-पाच वर्षांपूर्वी राजकारणात आले म्हणून संपूर्ण जिल्ह्यावर आपलाच अधिकार आहे, असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
या वादात काँग्रेसचे माजी नगरसेवक व पराभूत उमेदवार रामू तिवारी यांनी गंभीर आरोप केले आहेत. वाणी येथील एका हॉटेलमध्ये तब्बल १३ नगरसेवकांना डांबून ‘लॉकअप’सारखी स्थिती निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला असून, यामुळे प्रकरणाला अधिकच धार मिळाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात यापूर्वीही अनेकदा मतभेद उफाळून आले आहेत. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळातही संघटनात्मक निर्णय, उमेदवार निवड आणि स्थानिक नेतृत्वावरून दोघांमध्ये उघड वाद झाले होते. त्या वेळीही पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संवादाचा अभाव कायम राहिल्याने हा संघर्ष पुन्हा समोर आला आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही नेत्यांमधील वाद शमवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. “दोघेही तुल्यबळ आणि आक्रमक नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास होऊ शकतो. कोणताही राजीनामा दिलेला नाही, दोघांशी संवाद सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, “या वादामागे संवादाची कमतरता आहे,” हेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान, या अंतर्गत संघर्षाचा फटका चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणांना बसणार का, अशी चिंता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपने मात्र रणनीती आखत विजयी आणि पराभूत उमेदवारांची संयुक्त बैठक घेतली आहे. या बैठकीला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.
काँग्रेसमधील हा वाद वेळेत मिटला नाही, तर चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेसच्या हातातून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची भूमिका आणि आगामी निर्णयांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




