एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

प्रदेशाध्यक्षांच्या अधिकृत यादीशी छेडछाड, १७ उमेदवार बदलले; मुनगंटीवारांचा गंभीर आरोप, “हा संघटित कट, गद्दारांना माफी नाही”

चंद्रपूर : एबी फॉर्म चोरीमुळे भाजपला कमी जागा, तरी महापौर भाजपचाच होणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळण्यामागे “एबी फॉर्म चोरी” हेच मुख्य कारण असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीतील तब्बल १७ नावे परस्पर बदलण्यात आली. हा प्रकार केवळ तांत्रिक घोळ नसून पक्षाशी केलेली उघड गद्दारी असल्याचे मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितले.

ते म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंतिम केलेली यादी जर बदलली गेली नसती, एबी फॉर्मची चोरी झाली नसती, तर आज चंद्रपूर महापालिकेचे चित्र पूर्णपणे वेगळे असते. तरीही भाजप व मित्र पक्षांचे २४ नगरसेवक आणि काँग्रेससोबत न गेलेले पक्ष व अपक्ष मिळून आमचा मॅजिक फिगर ३४ होत आहे. त्यामुळे महापालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, याचा मला ठाम विश्वास आहे.”

२०१७ मध्ये भाजपचे ३६ नगरसेवक निवडून आले होते, तर यावेळी हा आकडा २३ वर आला. यामागे मतदारांचा कौल नव्हे, तर अंतर्गत विश्वासघात कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. “एबी फॉर्म चोरून हा सर्व प्रकार घडवला गेला. हा प्रकार झाला नसता तर निकाल वेगळा असता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे २७ आणि मित्रपक्षांसह ३० नगरसेवक निवडून आले असले तरी मतदारांनी दोन्ही पक्षांना समान संधी दिली आहे. काँग्रेस नेते सत्ता स्थापनेचे दावे करीत असले तरी भाजपकडेही संख्याबळ असल्याचे मुनगंटीवार यांनी ठासून सांगितले.

अल्प फरकाने जागा हुकल्या – किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांनीही निकालावर प्रतिक्रिया देताना अंतर्गत गोंधळाकडे अप्रत्यक्ष बोट दाखवले.
“आम्ही पूर्ण ताकदीने लढलो. विकासाच्या अजेंड्यावर मतदारांपर्यंत पोहोचलो. मात्र काही जागा अगदी अल्प फरकाने गेल्या, त्यामुळे अपेक्षित आकडा गाठता आला नाही. या निकालाचे सखोल चिंतन करणार,” असे ते म्हणाले.

देशाच्या राजकारणात अभूतपूर्व घटना

भारताच्या राजकारणात आजवर असा प्रकार कधीही घडलेला नाही की प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेली अंतिम उमेदवार यादी जिल्हा पातळीवर बदलली जावी. त्यातही भाजपसारख्या संघटन आणि शिस्तप्रिय पक्षात अशी सुतराम शक्यता नसताना चंद्रपुरात घडलेली ही घटना अत्यंत आश्चर्यकारक व धक्कादायक आहे. आता या प्रकरणात पक्षश्रेष्ठी अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण चंद्रपूरकरांसह भाजपच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. एबी फॉर्म बदलणे ही केवळ चूक नाही—ती पक्षाशी केलेली गद्दारीच आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर पक्षातील निष्ठेचा पाया डळमळीत होईल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.