सरकारी फाईल्स ५ हजार रुपयांत भंगारवाल्याला विकल्या; सीसीटीव्हीमध्ये पुरावा सापडल्यावर निलंबन व अंतर्गत चौकशी सुरू
नागपूर – केंद्र सरकारच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी कार्यालयातील महत्त्वाच्या सरकारी फाईल्स थेट भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नागपूरच्या सिव्हिल लाइन्स परिसरात, व्हीसीए स्टेडियमसमोर केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाचे झोनल कार्यालय आहे. याच कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिक मोहित गुंड याने ही धक्कादायक कृती केली आहे.
मोहित गुंड याची सुरुवातीला इंदौर येथील सीजीएसटी कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली होती. मात्र, तो वारंवार दारू पिऊन कामावर येत होता, तसेच अनेक वेळा गैरहजर राहू लागल्यामुळे त्याची बदली नागपूरमधील एसजीएसटी कार्यालयात करण्यात आली होती.
याच दरम्यान, नागपूरच्या जीएसटी रेंज कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या सरकारी फाईल्स अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर कार्यालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मोहित गुंड फाईल्स एका रिक्षामध्ये भरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले.

पुढील चौकशीत उघड झाले की, मोहित गुंड याने त्या सर्व फाईल्स एका भंगारवाल्याला केवळ ५,००० रुपयांत रद्दीच्या दराने विकल्या होत्या. ही माहिती मिळताच विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित भंगारवाल्याशी संपर्क साधून, त्याला मूळ रक्कम देऊन फाईल्स तात्काळ परत मिळवून दिल्या.
या प्रकारामुळे संपूर्ण विभागात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मोहित गुंड याला तत्काळ निलंबित करण्यात आले असून, फाईल्सच्या सुरक्षेबाबत आता विभागीय पातळीवर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे केवळ एक कर्मचाऱ्याची बेफिकिरीच नव्हे, तर सरकारी कागदपत्रांच्या सुरक्षेची ढिसाळ यंत्रणा देखील उघड झाली आहे. अशी महत्त्वाची कागदपत्रे सहज बाहेर कशी गेली, यावरून प्रशासनाची जबाबदारी आणि कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे.