भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देशभरातून मिळाल्या, पण चंद्रपूरमधील भाजपचे काही खास चेहरे — आमदार जोरगेवार, आमदार भांगडिया, शोभा फडणवीस — मात्र ‘मौनव्रती’; चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत
📝 सविस्तर बातमी:
भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज ३० जुलैला वाढदिवस. देशभरातून त्यांना नेते, कार्यकर्ते, चाहते आणि विविध पक्षांतील सहकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, त्यांचेच गृहजिल्हा असलेल्या चंद्रपूरमधून मात्र चित्र वेगळेच दिसले. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू — शोभा फडणवीस — यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर मुनगंटीवारांच्या वाढदिवसाचा कोणताही उल्लेख नव्हता.
भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षात अंतर्गत मतभेद जाहीरपणे समोर येत नाहीत. मात्र चंद्रपूर भाजपमध्ये मात्र हे वितुष्ट आता सोशल मीडियातून स्पष्ट जाणवत आहे. किशोर जोरगेवार हे मुनगंटीवारांच्या राजकीय छत्रछायेखाली तयार झाले असले तरी २०१४ नंतर त्यांच्यात तणाव वाढला. जोरगेवारांनी शिवसेना, काँग्रेसचा प्रवास करून अखेर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्यांचे झुकाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिक असल्याचे जाणवते. नुकत्याच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चंद्रपूरमध्ये संपूर्ण आठवडा विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

शहराध्यक्षांपासून ते मुनगंटीवारांनी उभे केलेले अनेक चेहरे त्यांच्या वाढदिवशी मौनात राहिले, हे भाजपमधील अंतर्गत राजकारणाची स्पष्ट साक्ष देत आहे. विधानसभेच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुनगंटीवार आणि शोभा फडणवीस यांच्यात वाढलेले तणाव अजूनही निवळलेले नाहीत. त्यामुळेच चंद्रपूर भाजपमध्ये ‘मुनगंटीवार विरुद्ध इतर सर्व’ अशी छुपी लढत सध्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीत मात्र माजी केंद्रीय मंत्री व सध्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वरोऱ्याचे आमदार करण देवतळे यांनी सोशल मीडियावर मुनगंटीवार यांना उघडपणे शुभेच्छा दिल्या.
देशभरातून प्रेमाने शुभेच्छा मिळाल्या तरी आपल्या गृहजिल्ह्यातून उपेक्षा मिळणे, हा विरोधकांपेक्षा घरातलाच संघर्ष अधोरेखित करणारा आहे.