“देवाभाऊ” च महाराष्ट्राचे “गडकरी”; महायुती सरकारचा उद्या शपथविधी

भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीत फडणवीस यांची एकमुखी निवड; ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर शपथविधी सोहळ्याची तयारी


महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होणार असून, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आज पार पडलेल्या बैठकीत त्यांची एकमुखी निवड झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केंद्रीय निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थिती लावली.

चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व भाजप आमदारांनी अनुमोदन दिलं. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याचा शेवट झाला आहे. महायुतीला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला होता, परंतु काही मतभेदांमुळे हा निर्णय उशिरा झाला.


शपथविधीचा भव्य सोहळा:

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, नवे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

शपथविधी कार्यक्रमासाठी २५,००० हून अधिक लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, महिलांसाठी एक “लाडकी बहीण कक्ष” तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये १०,००० महिलांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात महायुती सरकारला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे.


राजकीय पार्श्वभूमी:

२३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. परंतु, मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्तास्थापनेला उशीर झाला. एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मात्र, भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे आधीच निश्चित झालं होतं, आणि आजच्या बैठकीनंतर फडणवीस यांचे नाव अंतिम ठरले.


फडणवीस यांची प्रतिक्रिया:

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. त्यांनी नम्रपणे सांगितलं, “एका सामान्य कार्यकर्त्याला तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, हे मोदींच्या नेतृत्वाचं आणि पक्षाच्या धोरणाचं यश आहे. मला मिळालेली संधी ही माझ्या पक्षाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असल्याचं द्योतक आहे.”


निर्मला सीतारामण यांचे भाष्य:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या कौलाला देशभरासाठी प्रेरणादायी ठरवले. त्या म्हणाल्या, “महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचा संदेश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे जनतेने भाजपाला पुन्हा एकदा मोठा कौल दिला आहे.”


शासनाची दिशा:

महायुती सरकारने आपल्या पहिल्या घोषणेमध्ये राज्याच्या विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि शेती क्षेत्रातील सुधारणांसाठी ठोस पावले उचलली जातील, असं सांगण्यात आलं. आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.