खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! व्हायरल व्हिडीओने काँग्रेससाठी अडचणीत वाढ  

 “कुणाला सरळ करायचं ते मी ठरवेन” – धानोरकरांच्या विधानावर चंद्रपूरकरांचा संताप

चंद्रपूर: वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेले वक्तव्य आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांच्या धमकीवजा इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावरून चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. 

सभेत धानोरकर म्हणाल्या, “जे माझ्या विरोधात काम करत आहेत, त्यांचा गावागावाचा हिशोब माझ्याकडे आहे. २० नोव्हेंबरनंतर मतदान होईल, तेव्हा प्रत्येकाचा पत्ता लागेल. कुणाला कसं ठेवायचं, आणि कुणाला सरळ करायचं, हे ठरवायला मला वेळ लागणार नाही.” या विधानावरून विरोधकांबरोबरच काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे.

 कुणबी समाजाला धमकावण्याचा आरोप

खासदार प्रतिभा धानोरकर या केवळ एका समाजाच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नाहीत. मात्र, त्यांना जिंकवून देण्यात बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचा मोठा वाटा होता. “हा समाज त्यांचा महत्वाचा पाठीराखा असूनही त्यांना अशा प्रकारे धमकावणे काँग्रेसला मान्य आहे का?” असा सवाल वरोरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विचारला जात आहे. “काँग्रेसचे हायकमान या घटनेकडे गांभीर्याने पाहतील का?” असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.

 “सूडबुद्धीने वागणार का?” – चंद्रपूरवासीयांचा सवाल

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नागरिक खासगीत बोलताना म्हणत आहेत, “केंद्रात काँग्रेसची सत्ता असती, तर अशा प्रकारे सूडबुद्धीने चंद्रपूरच्या खासदार मॅडमने काय केले असते?” अशा वक्तव्यांमुळे सामान्य मतदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक मतदार भाजपच्या खासदारांशी तुलना करत, “अशा धमकीवजा नेत्यांपेक्षा भाजपचे खासदार कधीच बरे” असे मत व्यक्त करत आहेत.

 काँग्रेससाठी बदलते गणित?

या वादग्रस्त विधानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या निवडणूक तयारीला फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी खासगीत मान्य केले आहे की, “या भाषणामुळे चंद्रपूरसह वणी, यवतमाळ या विधानसभांतील काँग्रेसचे गणित बिघडले आहे.” 

 काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत फूट?

धानोरकर कुटुंबात याआधीच वादळ उठले आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. धानोरकर यांच्या या भाषणामुळे अनिल यांच्या प्रचाराला अप्रत्यक्षपणे अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. 

 काँग्रेसची प्रतिमा धोक्यात?

या वादग्रस्त विधानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेमध्ये काँग्रेसविषयी संताप वाढत असून, “काँग्रेसच्या हायकमानने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे,” अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे काँग्रेसची जिल्ह्यातील निवडणूक स्थिती कमकुवत झाली आहे, असे काँग्रेसचेच काही नेते कबूल करत आहेत. 

 व्हायरल व्हिडीओमुळे काँग्रेसच्या आव्हानात वाढ

प्रतिभा धानोरकर यांचे विधान व्हायरल झाल्याने चंद्रपूरमधील ६ विधानसभा मतदारसंघांसह शेजारील वणी व यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेसची समीकरणे बिघडल्याचे काँग्रेसच्या नाराज नेत्यांचे म्हणणे आहे. “या भाषणामुळे निवडणूक पूर्वसंध्येला पक्षासाठी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत,” असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील मान्य करत आहेत. 

 सामान्य चंद्रपूरवासीयांचे विचार

“अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या नेत्यांपेक्षा भाजपचे खासदार बरे,” असा विचार नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.