सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे विदर्भातील एकमेव आमदार बल्लारपूर विधानसभेत 25985 मतांनी विजयी

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..25985… मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार आहे.

विजयाचा उंच आलेख

१९९५ मध्ये तत्कालीन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन ५५ हजाराच्या वर मताधिक्य घेत विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा बहुमान त्यांनी पटकाविला. त्यानंतर १९९९, २००४ पर्यंत सलग ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून गेले व विजयाची हॅट्रिक त्यांनी केली. त्यानंतर मतदार संघ पुनर्रचनेनंतर त्यांनी शेजारच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढली. या विधानसभा क्षेत्रातुन देखील त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली. २००९, २०१४, २०१९ मध्ये मताधिक्याने निवडणूका त्यांनी जिंकल्या. २०१४ मध्ये राज्याच्या अर्थ व वनमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर वने, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे ते मंत्री ते झाले.

सन्मान आणि पुरस्कार

मंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट आमदार पुरस्कार, राज्याच्या आर्थिक प्रगती मध्ये बहुमोल योगदान दिल्या बद्दल त्यांना इंडिया टुडे समूहातर्फे देशातील बेस्‍ट फायनान्‍स मिनीस्‍टर या पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले. आफ्टरनून व्हॉइस या वृत्त संस्थेतर्फे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर, लोकमत चा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, जेसीआय चा मॅन ऑफ द इयर अशा अनेक प्रतिषठेच्या पुरस्कारांनी सुधीर मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले.वनमंत्री पदाच्या काळातील त्यांच्या पुढाकाराने झालेल्या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद गिनीज बुक तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.

विधानसभेतील यशस्वी संसदीय संघर्ष

राज्यात १९९९, २००४, २००९ असे पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते तरी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करत केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला भाग पाडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नागपूर विद्यापीठाला देणे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विद्यापीठाला देणे, सवित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देणे, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, मातंग समाजासाठी आयोग नेमणे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसाना नोकऱ्या, भिडेवाड्याची दुरुस्ती, आदिवासी समाजासाठीची प्रलंबित पदभरती, क्रांतीवीर बाबुराव शेडमाके, संत संताजी जगनाडे महाराजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करणे असे अनेक निर्णय त्यांच्या संसदीय संघर्षातून घेण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपूर्व असा निधी अर्थमंत्री पदाच्या काळात त्यांनी खेचून आणला. सैनिक शाळा, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनीकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, चिंचडोह प्रकल्प, कोटगल बॅरेज, पळसगाव आमडी सिंचन प्रकल्प, चिंचाळा व सहा गावांसाठी पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा, मौलझरी सिंचन प्रकल्प, रस्ते व पुलांची सर्वाधिक कामे,एसएनडिटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र अशी विकासाची मोठी मालिका त्यांनी तयार केली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी,सिंचन,पायाभूत सुविधा या क्षेत्रात चौफेर विकास त्यांनी केला.

गोंडवाना विद्यापीठातर्फे डि.लीट ने सन्मानित

नुकतेच काही महिन्यापूर्वी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट अर्थात डी लिट पदवी देत त्यांना सन्मानीत करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या विधानसभेला, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुपरिचित आहे. आमदार म्हणून सातव्यांदा विजयी झाल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवून दिलं ‘टायगर अभी जिंदा है..’

म्हणाले होते, ‘मै चुनाव हारा हूं… हिम्मत नहीं हारा’

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि चंद्रपूरसाठी भाजपच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आले. हे त्यांच्या इच्छेविरुद्ध घडले होते. पण तरीही पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांचा आदेश पाळून ते लोकसभा निवडणूक लढले. पूर्ण शक्ती लावली. काँग्रेसच्या फेक नरेटिव्हमुळे त्यांचा पराभव झाला. पण ते मुनगंटीवार आहेत. पराभव झाल्यावर पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनासाठी त्यांनी सभा घेतली. ती सभा नव्हती… एल्गार होता. ‘मै चुनाव हारा हूँ… हिम्मत नहीं हारा!’. हे त्यांचे शब्द होते. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत त्यांनी आपले शब्द तंतोतंत खरे ठरवले आहेत. आजच्या त्यांच्या विजयानंतर ‘टायगर अभी जिंदा है..’, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी 26,047 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा त्यांनी बदलवला. त्यामुळे जनतेने त्यांना कौल दिल्याचे आता सिद्ध झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधानसभेत मात देणे सोपे आहे, असे महाविकास आघाडीला वाटले होते.

विशेषतः चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसच्या बाजुने कौल दिल्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण तो काँग्रेसचा अतिआत्मविश्वास ठरला. अन् तोच त्यांना नडला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. तरीही त्यांनी आनंदाने पक्षाचा आदेश पाळला. मात्र, त्यांच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचा जलवा कमी झाला, असा अनेकांचा गैरसमज झाला होता, तो आजच्या निकालाने खोटा ठरला.

लोकसभेतील पराभवानंतरही मुनगंटीवार यांनी 22 जून 2024 ला बल्लारपूरला एक सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनासाठी ही सभा होती. या सभेतील मुनगंटीवार यांचे शब्द लोक विसरलेले नव्हते. ‘मै चुनाव हारा हूं… हिम्मत नहीं हारा’ असे त्यांनी लोकांना सांगितले. त्यानंतर ते पराभव विसरून पुन्हा कामाला लागले. राज्याचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांचे उत्तमरित्या पालन केले. अगदी प्रचाराच्या धामधुमीतही त्यांनी जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले नाही.

जनकल्याणाचा जाहीरनामा घेऊन जनतेपुढे गेले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीचे ते प्रमुख आहेत. जनतेची नस माहिती असलेला नेता जाहीरनामा ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी होता. त्यामुळे विकासाचा रथ बल्लारपूरच्या माध्यमातून पुढे जाणार, याचा विश्वास मतदारांना होता. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसला, असेच म्हणावे लागेल.