शिवानी वडेट्टीवार यांची महावितरण अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली…

शिवानी वडेट्टीवार यांची महावितरण अधिकाऱ्यांना शिवीगाळ: प्रचार सभेत शिवराळ भाषेने गोंधळ

अंधारात सभा, शिव्यांचा वापर – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यावर टीकेचा भडिमार

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आकापूर गावात नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत सभेची हवा गरम केली. गावात विजेचा पुरवठा खंडित असल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता, आणि त्यातच शिवानी वडेट्टीवार यांनी मोबाइलच्या टॉर्चच्या उजेडात सभा घेतली.

अंधारात आयोजित सभेत शिवानी वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर सडकून टीका केली आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिव्या देत त्यांना धमकीही दिली. “माझे वडील विरोधी पक्ष नेते आहेत; ते उद्याचे मुख्यमंत्री होतील आणि तेव्हा या सर्वांना त्यांच्या योग्य जागेवर दाखवू,” असे वक्तव्य करीत शिवानी यांनी निवडणूक प्रचारातील भाषा खालच्या स्तरावर नेली.

या प्रकारामुळे शिवानी वडेट्टीवार यांची भाषा आता टीकेचा विषय बनली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या शिवराळ भाषेचा वापर निवडणूक प्रचारात योग्य नसल्याची भावना लोकांमध्ये दिसून येत आहे.