नागपुरात ‘संविधान संमेलन’: राहुल गांधींचा सहभाग, काँग्रेसचा ‘संविधानप्रेम’ आणि बहुजन समाजाची ‘भावना’ ?

कार्यक्रमाची योजना की काँग्रेसचा ‘नवा कार्यक्रम’?

ओबीसी युवा अधिकार संघटनेच्या वतीने आज नागपुरातील सुरेशभट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असून, नागरिकांमध्ये हा कार्यक्रम काँग्रेसद्वारे पूर्णतः ‘प्रायोजित’ असल्याची चर्चा रंगली आहे. पोस्टरवरूनच प्रायोजकाचा ‘गंध’ येतो, कारण ते अगदी त्यांच्याच स्टाईलने रचले आहे, अशी आज नागपुरात चारच रंगली होती.

पोस्टरवर राहुल गांधींचा ‘महापुरुष’ होण्याचा नवा प्रयोग

कार्यक्रमाच्या पोस्टरवर राहुल गांधी यांना थेट महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रांगेत’ दाखवले आहे. जणू काही बहुजन समाजाच्या या नायकांच्या कर्तृत्वाशी राहुल गांधींचे योगदान ‘तुलनीय’ असल्याचा आव आणला गेला आहे. बहुजन समाजातील लोकांना हे चित्र म्हणजे ‘स्वत:च्याच प्रतिमेचा महिमा वाढवण्याचा’ एक निव्वळ प्रयत्न वाटतोय. हा प्रयोग म्हणजे बहुजन समाजातील ऐतिहासिक नेत्यांचा अपमानच म्हणावा लागेल! अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी पोस्टरवरून केली.

‘संविधानाचा सन्मान’ की ‘कॉंग्रेसचा प्रचार’?

या पोस्टरमुळे कार्यक्रमाचे स्वरूप संविधानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आहे की काँग्रेसचा प्रचार करण्याचे, हेच कळेनासे झाले आहे. ‘संविधान संमेलन’ ही संकल्पना एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात पक्षप्रचाराच्या बॅनर घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न वाटतो. बहुजन समाजाच्या नायकांच्या कार्याची तुलना ‘जोडून’ काँग्रेसचा प्रभाव पसरवायचा हा एक राजकीय डावच वाटतोय. अशी भावना काही बहुजन नागरिकांनी बोलून दाखविली.

बहुजन समाजाची प्रतिक्रिया: ‘संतापाचा स्फोट’

राहुल गांधींना महापुरुषांच्या बरोबरीत दाखवल्याने बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे. ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष केला, त्यांच्यासोबत राहुल गांधींचा ‘प्रदर्शन’ केल्याने त्यांच्यावरील आदराला तडा जाण्याची भावना आहे. काँग्रेसला बहुजनांच्या ‘आदराचा आधार’ हवा होता, पण त्यांनी तो ‘चिडवण्याचा’ प्रयत्न केल्यासारखे वाटतेय.

‘संविधान, पोस्टर, आणि राजकीय मार्केटिंग’

संविधानाच्या संमेलनाच्या नावाखाली राहुल गांधींचे ‘पोस्टरबाजी’ करणे म्हणजे एक प्रकारचा राजकीय ब्रँडिंगचा प्रयत्न आहे. बहुजन समाजाच्या नेत्यांचा सन्मान राखणे आणि संविधानावर चर्चा करणे यापेक्षा या कार्यक्रमाचे मूळ ध्येय काहीतरी वेगळेच वाटत आहे.