सामाजिक सेवेपासून राजकारणापर्यंतचा प्रवास, संघाच्या रणनीतीने गडचिरोलीत भाजपला दिली नवी उमेद
गडचिरोलीच्या राजकीय पटावर भाजपच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले डॉ. मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवत पक्षाला नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणारे डॉ. नरोटे यांनी केवळ पक्षाची ताकद वाढवली नाही, तर गडचिरोलीतील तरुण पिढीला आपले नेतृत्व स्वीकारायला भाग पाडले.
भाजपच्या नव्या वाटचालीचा शुभारंभ
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या आघाडीने गडचिरोलीत काँग्रेसचा विजय नक्की असल्याचे चित्र निर्माण केले होते. परंतु, भाजपने मिळालेल्या पराभवाचा धडा घेत गडचिरोलीत नवीन रणनीती आखली. विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना उमेदवारी नाकारून पक्षाने तरुण चेहरा डॉ. मिलिंद नरोटे यांच्यावर विश्वास ठेवला. वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. नरोटे यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली.
संघाची भूमिका आणि संयमाचे नेतृत्व
संपूर्ण निवडणुकीदरम्यान संघटनेने केलेले सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांनी मैदानात घेतलेले प्रचंड परिश्रम भाजपसाठी फायदेशीर ठरले. डॉ. नरोटे यांच्या शांत, संयमी स्वभावामुळे त्यांनी केवळ काँग्रेसच नव्हे तर पक्षांतर्गत विरोधही व्यवस्थित हाताळला. लोकसभेतील पराभवानंतर पक्षात आलेल्या मरगळीतून गडचिरोली भाजपला बाहेर काढण्यात नरोटे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
‘स्पंदन’ने घडवले नेतेपद
डॉ. नरोटे हे वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी डॉक्टर असले तरी त्यांनी ‘स्पंदन फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजसेवेला नवीन दिशा दिली. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर भर देत त्यांनी तरुणांना सोबत घेतले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील युवकांची मजबूत फळी तयार झाली, जी निवडणुकीत त्यांची प्रमुख ताकद बनली.
गडचिरोलीत युवापर्वाची सुरुवात
डॉ. नरोटे यांच्या विजयामुळे गडचिरोली भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका उच्चशिक्षित आणि युवा नेत्याने राजकीय व्यासपीठावर घेतलेले स्थान हे गडचिरोलीसाठी नवा टप्पा मानले जात आहे. संघाच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली नवी दिशा आणि नरोटे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
तरुण आमदाराबद्दल मोठ्या अपेक्षा
गडचिरोली जिल्ह्याला अनेक वर्षांनी एक उच्चशिक्षित तरुण नेता मिळाल्याने स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षांचे वातावरण आहे. विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. नरोटे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास आहे.
“आता गडचिरोलीतून फक्त आशा नाही, तर ठोस विकासाचा मार्ग तयार होईल,” असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने गडचिरोलीतील राजकीय समीकरणे बदलत नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.