मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन वडेट्टीवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

वडेट्टीवार मागील दहा वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आपला विरोधकच शिल्लक ठेवला नाही, असे चित्र निर्माण करण्यात आले. आपला किल्ला शाबूत ठेऊन विरोधकांवर हल्ला चढवायचा, असा वडेट्टीवारांचा आतापर्यंत शिरस्ता राहिला आहे. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर आता त्यांना दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वडेट्टीवारांनी मुलगी शिवानीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात त्याच्याबद्दल कमालीची नाराजी आहे. भविष्यात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात आपला उत्तराधिकारी म्हणून शिवानीला प्रोजेक्ट केले जात आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी आहे. 

जवळच्या चार लोकांना वगळता इतरांना कामे दिली जात नसल्याचा रागही कार्यकर्त्यात आहे. काही दिवसापूर्वी सावली नारपंचायतीच्या अनेक नगरसेवकांनी वडेट्टीवारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निर्वाणीचा इशारा दिला होता. ती धग कायम आहे. 

वडेट्टीवारांचा राजकीय जन्म कट्टर हिंदुत्ववादी संघटनेतून झाला आहे. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले असले तरी त्यांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. अल्पसंख्याक असताना बहुजन समाजाचा नेता म्हणून ते मिरवताना दिसतात. भाषणातून फुले-शाहू -आंबेडकर सांगतात. पण प्रत्यक्षात कृती विरोधी. एका नातेवाईकाने अनुसूचित जातीच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, विजय वडेट्टीवारांनी प्रचंड विरोध केला. लग्नातही गेले नाही. बहिष्कारच घातला होता. अशी मानसिकता असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पडणे, हे राजकीय दुर्भाग्यच म्हणावे लागेल. वडेट्टीवारांची ही मानसिकता मतदारसंघात उघड झाल्याने दलित मतदारही त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. भाजपने बहुजन समाजाच्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन वडेट्टीवारांचा त्यांच्या होमपीच वरच खेळ खल्लास करण्याची योजना आखल्याचे दिसते.

घराणेशाही, दलित विरोधी भूमिका तसेच  जवळच्या चार लोकांना ठेके दिले जात असल्याने इतर कार्यकर्त्यात नाराजी या स्थानिक मुद्यावर जोर देऊन भाजपकडून वडेट्टीवारांविरुद्ध मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.