विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या भांडणात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागांचे भवितव्य धोक्यात !

भाग 1 मध्ये चंद्रपूर, वरोरा आणि बल्लारपूर मतदारसंघाचा घेतलेला “द पीपल” न्यूजने घेतलेला आढावा.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता सार्वजनिक पातळीवर पोहोचले आहेत आणि यामुळे काँग्रेसला गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांच्या संघर्षात जिल्ह्यात काँग्रेसच्या तिकीट वाटपात घोळ झाला. ज्याचा फटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसण्याची भीती पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या संघर्षात जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रम्हपुरी आणि चिमूर या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहे.
चार महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला प्रचंड लीड मिळाली. प्रतिभा धानोरकर मोठ्या मताधिक्क्याने जिंकून आल्या. पण विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्याचा फायदा उमेदवार देताना वडेट्टीवारांनी घेतला. पण पक्षाला हानी पोहचत आहे.

1. वरोरा विधानसभा मतदारसंघ

– या मतदारसंघातून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या लाडक्या भावाला उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे हे काही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. ते धानोरकरांचे दिवाणजी म्हणून काम बघत होते. पण संधी साधून प्रतिभा धानोरकरांनी भावाला पुढे केले. त्यामुळे खासदार धानोरकरांवर समाज प्रचंड नाराज आहे. घरातही उभी फूट पडली. सासू आणि दीर विरोधात गेले. पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन अधिक होण्याची शक्यता आहे. बहुरंगी लढतीचे चित्र आहे. या लढतीत भाजप- महायुतीचे करण देवतळे, काँग्रेसचे प्रवीण काकडे, शिवसेना उबाठा बंडखोर मुकेश जिवतोडे, वंचितचे अनिल धानोरकर (काँग्रेस बंडखोर), डॉ. चेतन खुटेमाटे( काँग्रेस बंडखोर), वरोराचे माजी नगराध्यक्ष एहतेशाम अली, राजू गायकवाड यांचा समावेश राहील. या मतदारसंघात धनोजे कुणबी समाज मोठा असून, खासदार प्रतिभा यांनी घराणेशाही सुरु केल्याने नाराज समाज आता काँग्रेससोबत नाही. मुकेश जिवतोडे, अनिल धानोरकर आणि चेतन खुटेमाटे हे या समाजाची बऱ्यापैकी मते घेतील. विशेषतः भद्रावती तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या भागातील वंचितची दलित मते अनिल धानोरकर खातील. अपक्ष एहतेशाम अली हे मुस्लिम समाजाची गठ्ठा मते घेतील. राजू गायकवाड हे माना समाजाचे आहेत. पण रमेश गजबे यांनी भाजपात प्रवेश घेतला असल्याने गायकवाड हे भाजपाला फार नुकसान करू शकणात नाही. माजी मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांचे चिरंजीव करण यांच्या पाठीशी खैरे कुणबी समाज भक्कमपणे आहे. तसेच वडिलांची पुण्याई आणि पक्षाचे बळ यावर देवतळे पुढे निघतील. खासदार प्रतिभा धानोरकरांच्या चुकीमुळे काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या भांडणात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागांचे भवितव्य धोक्यात !

2. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ

– मागील 30 वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसला सतत पराभव पत्करावा लागत आहे. सन 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसच्या सर्वच मोठ्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. दलित मतांच्या बळावर राजकारण करीत असलेल्या काँग्रेसला दलितांना उमेदवारी देणे म्हणजे उपकार केल्यासारखे वाटू लागले आहे. कोणालाही उमेदवारी देऊन मोकळे. मग पहा तुमचे तुम्ही, अशीच भूमिका राहिली आहे. 2019 मध्येच काँग्रेसनं किशोर जोरगेवारांना उमेदवारी दिली असती, तर आज जिल्ह्याच्या ठिकाणी पक्षाचा हक्काचा उमेदवार राहिला असता. आताही प्रवीण पडवेकरांसारखा डमी उमेदवार दिला. खासदार प्रतिभा यांनी लाडक्या भावाचा लाड पुरविताना लोकसभेत ज्याची मदत घेतली, त्यालाच ऐनवेळी फटकारले. राजू झोडे यांना विजय वडेट्टीवारांचा विरोध होता. म्हणून त्यांनी प्रवीण पडवेकर यांचे नाव पुढे करून उमेदवारी आपल्या कोट्यात घेतली. पण फायदा काय? राजू झोडे यांनी बंडखोरी केली. त्यांना आता वंचित बहुजन आघाडी समर्थन दिले. त्यामुळे काँग्रेसला डबल नुकसान होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दलित आणि मुस्लिम मतांचे मोठे विभाजन होताना दिसते. तसेच धानोरकर समर्थक कोणताही पदाधिकारी आणि कार्यकर्ता पडवेकर यांच्या प्रचारात अजून तरी दिसत नाही. या मतदारसंघात वडेट्टीवारांचे समर्थक बोटावर मोजण्याएवढेही नाही. नंदू नागरकर हे पडवेकरांना चिपकल्याने धानोरकर समर्थक आणखी दूर गेले. भाजपाही बंडखोरी आहे. राजकारणातील ‘अभिनेता’ अशी ओळख असलेल्या ब्रिजभूषण पाझारे यांची बंडखोरी दखलपात्र असली तरी काँग्रेससाठी अजिबात फायद्याची नाही. त्यामुळे जोरगेवारांचे नशीब पुन्हा फडफडणार अशी स्थिती आहे.

विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या भांडणात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागांचे भवितव्य धोक्यात !

3) बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ

– या मतदारसंघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोषसिंग रावत आणि काँग्रेस बंडखोर डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात लढत होताना दिसते. संतोष रावत हे वडेट्टीवार समर्थक आहेत. तर डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी देण्यासाठी नाना पटोले इच्छुक होते. पण स्थानीक नेत्यांचा त्यांना विरोध होता. खासदार धानोरकर यांचा गावतुरे यांना विरोध होता. उच्चशिक्षित आणि आक्रमक असलेल्या गावतुरेंमुळे भविष्यात धोका निर्माण होईल या भीतीने धानोरकरांनी विरोध केला. त्याचा फायदा वडेट्टीवार समर्थक रावत यांना मिळाला. पण गावतुरे यांच्या बंडखोरीमुळे रावत प्रचंड अडचणीत आहेत. काँग्रेसच्या मतांचे विभाजन होताना दिसते. तसेच लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभा निवडणुकीत नाही. दलित आणि कुणबी मते भाजप, काँग्रेस, गावतुरे आणि वंचित मध्ये विभागली जातील. या मतदारसंघात मुनगंटीवारांना काँग्रेस भीती कमी आणि स्वपक्षीय नेत्यांची अधिक आहे. हंसराज अहीर, शोभा फडणवीस, बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार हे विरोधकांना रसद पुरवत असल्याची चर्चा आहे. हे विरोधक आधीही होते. पण तीव्रता कमी होती. आता वाढली आहे. पण सर्वसमावेशक, लोकांत मिसळणारा, विकासाभिमुख चेहरा म्हणून मुनगंटीवारांकडे पहिले जाते. लोकसभेत केलेली चूक विधानसभेत होऊ द्यायची नाही, अशी भूमिका काही समाजानी घेतल्याची चर्चा आहे. रावत हे वडेट्टीवार यांच्या हातातील बाहुले असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा विरोध आहेच. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील राजकारणामुळे रावत आणि धानोरकर यांच्यात मोठे वैर आहे. मागील दोन वर्षात काय घटना घडल्या, कोणी कोणावर कोणते आरोप केले, हे जनतेच्या लक्षात आहे. रावत यांना धानोरकरांचे समर्थन मिळावे म्हणून बँकेचे माजी संचालक रवींद्र शिंदे यांनी वरोरा मतदारसंघात धानोरकरांना पाठिंबा दिला. पण धानोरकर आतल्या गाठीच्या राजकारणी आहेत. काटा काढल्याशिवाय त्या वैर विसरत नाही. त्यामुळे रावत यांना बल्लारपुरात धानोरकरांचा काहीही फायदा होणार नाही, असेच चित्र आहे.

विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या भांडणात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागांचे भवितव्य धोक्यात !