चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या प्रमुख जागांवर चुकीची निवड, मतदारांसमोर पराभवाची ‘निश्चिती’? कांग्रेस पक्षाने चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रांत त्यांची खास ‘महान’ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मतदारांना निवडणूक न लढवता पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवण्याची योजना आहे का काय, अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.
चंद्रपूरचे उमेदवारः पराभवाची खात्री!
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसने प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली आहे. होय, तेच पडवेकर ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभवाची गोडी चाखावी लागली होती. लोकांना आता उत्सुकता आहे की विधानसभा क्षेत्रात त्यांचा जनसंपर्क इतका अपारदर्शक आहे की बहुतेक मतदारांनाही ते माहित नसावेत! त्यामुळे, काँग्रेसचे मतदार आधीच मान्य करत आहेत की पराभव अटळ आहे.
बल्लारपूर: मुनगंटीवार यांच्यासमोर ‘डमी’ उमेदवार
बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना चांगले आव्हान देण्याची संधी होती, पण कांग्रेसने तिथे सिडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे. होय, तेच रावत ज्यांचा प्रभाव फक्त मूळ आणि पोम्भूर्णा येथे सीमित आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यापुढे कसलाही धक्का बसणार नाही हे आधीच स्पष्ट आहे. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी दिली असती, तर कदाचित काहीतरी रंगत आली असती, पण कांग्रेसला अशा गोष्टींची सवय नाही.

वरोरा: खासदार भावाचा ‘भाव’
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातून आपल्या भावाला, प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. प्रवीण काकडे कोण? अहो, ते साधे पदाधिकारीही नाहीत, मात्र त्यांची ओळख एकच आहे – “खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू.” कदाचित कांग्रेसला या नात्याचे फारच महत्त्व असावे. वरोरात अनिल धानोरकर किंवा चेतन खुटेमाटे यांच्यासारख्या दमदार नेत्यांना उमेदवारी दिली असती, तर कदाचित कांग्रेसचा विजय शक्य होता, पण पक्षाची प्राथमिकता वेगळीच दिसते.
निवडणुकीत कांग्रेसचा नवा ‘खेळ’
साट्या-लोट्याच्या या खेळात कांग्रेसने कमी ताकदीच्या उमेदवारांना संधी देऊन विरोधकांना मदत करण्याचे काम सुरुच ठेवले आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष यंदा मुकदर्शकाची भूमिका घेणार का, की प्रत्यक्ष लढणार, हे पाहणे मजेशीर ठरेल.
विधानसभा निवडणूक जिंकायची नसेल तर अशाच यादीला ‘मास्टरपीस’ म्हणावं!