काँग्रेसची चार जिल्ह्यांची आढावा बैठक सोमवारी चंद्रपुरात

चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहे. वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दिल्लीश्वरांनी कान टोचल्यानंतर होणाऱ्या या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या सूचना काँग्रेसश्रेष्ठींनी केल्या आहेत. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विदर्भात आढावा बैठका घेणे सुरू केले आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने काँग्रेसला बऱ्यापैकी साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिकच्या जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघापैकी अहेरी वगळता एकही मतदारसंघ महाविकास आघाडीतील घटक पक्षाला सोडायची नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यासाठीच ही आढावा बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, चारही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी खासदार, आमदार तसेच अनेक नेते उपस्थित राहणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीपासून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विळ्याभोपळ्याचे नाते राहिले आहे. त्यांच्यातील या अंतर्गत वादाचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होवू नये म्हणून दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दिल्लीश्वरांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना बऱ्यापैकी समज दिल्याचे सांगण्यात येते. पक्षाला अडचणीत आणणारी काही विधाने प्रतिभा धानोरकर यांनी गेल्या काही दिवसात केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. दिल्लीतील बैठकीनंतर वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात ‘पॅचअप’ झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार असल्याने या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांमधील भांडणे कार्यकर्त्यांच्या मुळावर उठत असल्याने असंतृष्ट कार्यकर्ते आढावा बैठकीत तक्रारीचा पाढा वाचणार असल्याची चर्चा आहे.