महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून अहिर दिल्लीत तर जोरगेवार मुंबईत

महायुतीतील बेबनाव मुनगंटीवारांना भोवणार काय?

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून अहिर दिल्लीत तर जोरगेवार मुंबईत

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असला तरी महायुतीत मात्र अजूनही प्रचारावरून बेबनाव सुरू आहे. उमेदवारीवरून काहीसे नाराज असलेले राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे राजधानी दिल्लीत बसले आहेत. तर महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हेसुद्धा वारंवार मुंबईच्या वाऱ्या करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत असल्याने या दोन्ही नेत्यांच्या मनात नेमके चालले तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत नियोजनाचा अभाव आणि अतिआत्मविश्वासामुळे हंसराज अहीर यांना पराभव पत्करावा लागला होता. उलट २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली असताना हंसराज अहिरांचा पराभव झाला. अहिरांच्या पराभवाला डीएमके (दलित, मुस्लीम, कुणबी) फॅक्टर कारणीभूत ठरला होता. या निवडणुकीतसुद्धा विकासापेक्षा जातीय राजकारण अधिक मजबूत दिसू लागले आहे. निवडणुकीतील जातीय समीकरण विकासावर वरचढ होत असल्याने जात आणि धर्मापलिकडे जावून राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होताना दिसते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून हंसराज अहीर यांनीही दिल्लीत जोर लावला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक लढण्याचा आदेश दिला. भारतीय जनता पक्ष हा कॅडरबेस म्हणून ओळखला जातो. या पक्षाला वैचारिक बैठक आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेत्यांमधील अंतर्गत मतभेद नसतील असे सातत्याने सांगितले जाते. मुनगंटीवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हंसराज अहिर उपस्थित होते. त्यानंतर आता आठवडाभरापासून ते कुठेही प्रचारात दिसत नाही.

अहिर हे चारदा या मतदारसंघातून जिंकून आले आहेत. जुन्या लोकसभा मतदारसंघातून एकदा तर विभाजनानंतर तिनदा लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. जिवतीपासून तर आर्णीपर्यंत त्यांचा जनसंपर्क आहे. पराभवानंतरही ते सतत कार्यकर्ते आणि लोकांच्या संपर्कात राहिले आहेत. आर्णी आणि वणी या दोन्ही विधानसभा क्षेत्रातून अहिरांना गेल्यावेळी लीड मिळाली होती. त्यामुळे अहिरांचे निवडणूक प्रचारात असणे महत्त्वाचे मानले जात असताना ते सध्या दिल्लीत अधिकच तळ ठोकून बसल्याचे दिसते. सध्या ते राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी असल्याने निवडणूक प्रचारात त्यांना सहभागी होता येत नाही, असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. पण, पंतप्रधान देशाचे आहेत. ते पक्षाच्या उमेदवाराची प्रचारसभा घेतात. मग अहिरांना अडचण काय, या प्रश्नावर अहिरांचे कार्यकर्ते मात्र निरूत्तर आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतरही अहिर हे सातत्याने पक्षाच्या व्यासपीठावर बसले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारापासून ते जाणीवपूर्वक दूर आहेत की काय, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यात उपस्थित केला जात आहे. याबाबत ‘द पीपल’शी बोलताना अहिर यांनी सांगितले की, सध्या मी दिल्लीत आहे. मुनगंटीवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वरोरा, घाटंजी, वणी यासह अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यामुळे प्रचारापासून दूर आहे, असे म्हणता येणार आहे. पक्षाने चारदा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलो. विधान परिषदेतही होतो. आता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदावर आहे. पक्षाबद्दल किंवा अन्य कोणाबद्दल मनात नाराजी नाही. आणि शंका घेण्याचे काही कारणही नाही.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किशोर जोरगेवार हे चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. भाजपा उमेदवाराचा पराभव करून त्यांनी विजय मिळविला. राज्यात सरकार स्थापन होताना त्यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता. पहाटेचे सरकार कोसळल्यानतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यानंतर जोरगेवारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. अडीच वर्षानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी किशोर जोरगेवारही गुवाहाटीला गेले होते. राज्यातील अपक्ष आमदारांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सर्वाधिक जवळीक जोरगेवारांशी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दापलिकडे जोरगेवार नाहीत, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येते. जोरगेवारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा असताना चंद्रपुरात मात्र त्यांनी अजूनपर्यंत प्रचारात सहभाग घेतलेला नाही. आचारसंहिता लागल्यापासून गेल्या २० दिवसांत ते अनेकदा मुंबईला जावून शिंदे आणि फडणवीसांच्या भेटी घेतल्या. शनिवारी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राज्यातील महायुतीच्या सर्व जागा जिंकून येतील, अशा शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी जोरगेवारांना बक्षीसही दिले. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून शिवसेनेने जोरगेवारांची नियुक्ती केली आहे. अवघ्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. लोकसभेतूनच विधानसभेचा मार्ग जातो. त्यामुळे जोरगेवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सध्यातरी स्थानिक प्रचारात न पडता मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळण्याची भूमिका जोरगेवारांनी घेतल्याचे दिसते. जोरगेवारांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हेसुद्धा कळण्याला मार्ग नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रामटेकचे निरीक्षक म्हणून जबाबदारी टाकली आहे. आणि आपण लवकरच रामटेकचा दौरा करणार असल्याचे किशोर जोरगेवार यांनी ‘द पीपल’ला सांगितले. हंसराज अहीर राजधानी दिल्लीतून आणि किशोर जोरगेवार राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या वाऱ्यात व्यस्त असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर हे दोन्ही नेते चंद्रपुरातही प्रचाराला लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.