जोरगेवारांचे कार्यकर्ते मुनगंटीवार यांचा प्रचार करणार

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे जुने पट्टशिष्य किशोर जोरगेवार यांच्यात दिलजमाई झाल्याची वृत्त “द पीपल” च्या हाती आले आहे. रविवारी ७ एप्रिलला मोदींच्या पूर्वसंध्येला दोघांच्या एका “कॉमन” मित्राकडे झालेल्या भेटीत काही गोष्टीवर “एकमत” झाल्यामुळेच आमदार जोरगेवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून या एकेकाळच्या गुरु शिष्यांमध्ये समेट घडवून आणल्याचे कळते. पंतप्रधानांच्या सभेपूर्वी महायुतीत सर्वकाही आलबेल आहे तसेच राज्याच्या सरकारला पाठिंबा देणारे सर्व पक्ष तसेच अपक्ष आमदार हे सोबत आहे हे दाखवून देण्याकरिता हा समेट घडवून आणल्याचे म्हटले जाते.
लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार माझा कसा उपयोग करून घेतात हे आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेदेखील मुनगंटीवार यांचा प्रचार करणार आहे, असे जोरगेवार यांनी सांगितले. या मनोमिलनने मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मोदींच्या सभेनंतर एका हॉटेलमध्ये मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यातसुद्धा बंद दरवाज्याआड चर्चा होऊन तोडगा निघाला आहे. वणी तसेच आर्णी या मतदार संघात हंसराज अहिर यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे त्यामुळेच मुनगंटीवारांना या दोन्ही मतदारसंघात अहिर यांच्या सहकार्याची गरज पडणार आहे. अहिर हेसुद्धा ओबीसी असल्यामुळे इतर ओबीसी मतदारांचा कल हा मुनगंटीवारांकडे वळण्याची शक्यता जास्त आहे.
चंद्रपूर लोकसभेची निवडणूक अचानक जातीपातीवर गेल्यामुळेच पंतप्रधानांचे ब्रम्हास्त्र प्रदेश भाजपने काढल्याची कुजबुज मतदार संघात होत आहे. पंतप्रधान मोदीच जेव्हा ओबीसी आहे तेव्हा कुणबीबहुल झालेली हि निवडणूक कुणबी विरुद्ध इतर जाती ठरण्याची दाट शक्यता झालेली आहे.
जवळपास दीड लाखांची झालेली मोदींची सभा चंद्रपूर तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभेचे राजकारण बदलू शकेल काय हे ४ जूनलाच कळेल.