चंद्रपूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी चंद्रपुरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवून पक्षांतर्गत कट्टर विरोधक असेलेल्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा डिचवलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील वाद अधिक टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील राजकिय वैर सर्वश्रुत आहे. हा वाद चंद्रपूरपासून व्हाया मुंबई दिल्लीपर्यंत पोहचला आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांचे राजकिय वारसदार म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सूरू केली आहे. पक्षश्रेष्ठीकडून धानोरकर यांना तसे संकेत दिल्या गेलेत, अशी पक्षाच्या वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आठवड्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार भाजपात जातील अशी चर्चा सुरू होती. परंतु अपात्रतेच्या भीतीने कोणतेही आमदार चव्हाण यांच्यासोबत गेले नाही. दरम्यान, अशोक चव्हाण भाजपवासी झाल्याने राज्यातील त्यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे पक्षातील वजन वाढले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख पाच नेत्यांमध्ये आता विजय वडेट्टीवार पोहोचले आहेत.
दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते झाल्यामुळे आपसूकच त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली आहेत. किंबहुना मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आहेत. अशातच रविवारी त्यांनी चंद्रपुरात आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून आमदार प्रतिभा धानोरकर यांना डिवचल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. पक्षांतर्गत विरोधकांची कोंडी करण्यासाठी वडेट्टीवारानी हवेत तीर सोडल्याचे सांगण्यात येते. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधकांची साफसफाई करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे हत्यार उपासल्याची चर्चा आहे.

आपला गड शाबूत ठेवून दुसऱ्याच्या गडावर सुरुंग लावण्यात विजय वडेट्टीवार माहीर आहेत. ऐनवेळी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही राहू शकतात. पण शिवानी यांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नेते अजिबात तयार नाहीत. एकदाचे विजय वडेट्टीवार चालतील, पण शिवानी नको, अशी भूमिका जेष्ठ नेत्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे बोलून दाखविली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची कोंडी झाली आहे. त्यांना केंद्रापेक्षा राज्यातच राहायचं आहे. पण जिल्ह्यातही एकाधिकार हवा असल्याने खटाटोप चालल्याचे दिसते. विजय वडेट्टीवारांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी अंतर्गत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न फसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.