मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली भूमिका स्पष्ट

चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडीशी आपले कोणतेही सोयरसूतक नाही. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आपली युती असल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या तीन जागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या तीन जागा लढण्यावर आपण ठाम असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.
मराठा सेवा संघाची जनसंवाद यात्रा १६ जानेवारीपासून सुरू झाली असून, ही यात्रा बुधवारी चंद्रपुरात पोहोचल्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. १६ जानेवारीला ही यात्रा हिंगोली येथून सुरू झाली. ३० जानेवारीला अकोला येथे समारोप आहे. कोरोनामुळे बरेच काम मागे पडले. आता पुन्हा नव्या उभारीने कामाला सुरुवात करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा सुरू असल्याचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय भूमिका स्पष्ट करताना खेडेकर यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीशी आपला संबंध नाही. मात्र, शिवसेनेच्या उबाठा गटाला पाठिंबा आहे. लोकसभेतील जागांबाबत ३० डिसेंबरला सकारात्मक चर्चा झाली. हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या लोकसभेच्या तीन जागांसाठी आमचा आग्रह आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे.

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

राममंदिर हा आस्थेचा विषय आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपालाच होईल, असे परखड मत खेडेकर यांनी मांडले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आहे. किंबहुना या समाजाला आरक्षण मिळावे, अशी सुरुवातीपासूनच आपली भूमिका राहिली आहे. संविधानिक चौकटीत आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत सामाजिक वातावरण अस्थिर झाले आहे. अनेक ठिकाणी भीतीदायक घटना घडत आहे. महिलांवरील अत्याचार वाढले, महिला बेपत्ता होत आहे. लोकांना हक्काचा रोजगार न देता फुकटात शिधा वाटप करून सरकार नेमके काय साध्य करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत केंद्र आणि राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली. सामान्य लोकांसाठी शिक्षण अवघड झाले आहे. शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने लोकहिताची जबाबदारी झटकून जातीजातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू तसेच इतर नियुक्त्या या ‘आरएसएस’शी संबंधितांच्या करण्यात आल्याच्या आरोपही पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, प्रा. दिलीप चौधरी, दीपक खामणकर, सुरेश माळवे, चंद्रकात वैद्य, सुधाकर खरपडे, संतोष कुचनकर, दीपक जेऊरकर आदी उपस्थित होते.