“ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या ‘राजकीय मॅच-फिक्सिंग’चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ”

भाजप विरोधाचे नारे देत देत त्याच भाजप नेत्यांना उमेदवार बनवणाऱ्या काँग्रेसच्या ताळतंत्रहीन खेळीने कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला; चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपटला पक्षाचा राजकीय हिशोब!

राजकारणात “कोणी कोणाचा?” हा प्रश्न नवा नाही. पण काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर “कोणतंही चालेल, बस पक्ष बघू नका!” असं दिलं आहे. ज्यांच्याविरुद्ध गेला दशकभर लढायचं ठरवलं होतं, त्याच भाजप नेत्यांबरोबर निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हसत हसत हातमिळवणी केली आणि कार्यकर्त्यांना केवळ डोकं खाजवायला सोडलं.

या तमाशाची सुरुवात झाली होती ३५८ पदांच्या वादग्रस्त भरतीप्रकरणापासून. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरतीवर आक्रमक टीका केली होती, एसआयटी चौकशीही झाली, पण त्याआधीच अनेक “भरती” झाली – ती काँग्रेस-भाजप संबंधांची! एकेकाळचे विरोधक, पक्षविरोधी सभा घेणारे, एकमेकांवर आरोप करणारे भाजप व काँग्रेस नेते – शेवटी एका ‘बँक युती मंचा’वर भेटले. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे सुभाष धोटे आणि दुसऱ्या बाजूला भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्या छत्रछायेखाली नविन भाजपवासी रवींद्र शिंदे!

सगळे मिळून चंद्रपूर जिल्हा बँकेसाठी “मैत्रीचा खेळ” खेळू लागले.

आणि गंमत म्हणजे मतदानाआधीच १२ संचालक बिनविरोध निवडले गेले. काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं – “खासदार विजयी झाली, आपलीच लाट आहे!”
पण लाट नव्हे, ती तर ‘राजकीय भूकंपाची’ सुरुवात होती. कारण काँग्रेसचेच धोटे बंधू माघार घेतले आणि एकमेकांमध्येच गोंधळ सुरू झाला.

इतक्यात काँग्रेसचे दिग्गज विजय वडेट्टीवार मैदानात उतरले. “आता सावरू!” असं वाटलं, पण तोपर्यंत भाजप आमदारांनी शिंदेंना “सेलेक्ट” करून थेट भाजपमध्ये “पेस्ट” केलं आणि अध्यक्षपद “ऑटो सेव्ह” झालं!

याच वेळी काँग्रेसचे काही संचालक ‘ड्युअल मोड’मध्ये काम करू लागले — एका हाताने भाजपला पाठिंबा, दुसऱ्या हाताने काँग्रेससाठी गुप्त बैठका.
राजकीय स्टोरीलाइन बनली – “Ctrl+C काँग्रेस, Ctrl+V भाजप!”

या सगळ्या नाट्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःला विचारायला सुरुवात केली —

“आम्ही कोणाच्या बाजूने आहोत?”
“लढायचं कोणाविरुद्ध?”
“सत्य काय, भूमिका काय, आणि नेतृत्व कुठे?”

पोस्टर लावायचं का जोडलंय हात?
बॅनर फाडायचा का सेल्फी घ्यायचाय?

महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांत काँग्रेसने अशीच ‘दोन्ही खेळती’ भूमिका ठेवली, तर मतदारांनी ‘Delete’ बटण दाबायला वेळ लागणार नाही. राजकारणात युती चालते, पण आत्मघातकी युतीचं हे क्लासिक उदाहरण आहे.