नागपूर, ता. २८: नागपूर शहरात उभारलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे शहराला नवीन ओळख मिळाली आहे. नागपूर हे आता बर्ड पार्कसह दिव्यांग पार्कसाठीही ओळखले जाईल. येत्या काही दिवसांत हे दिव्यांग पार्क तयार होणार असून, ऑक्सिजन बर्ड पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागपूरकरांनी या ठिकाणी येऊन आनंद घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
जामठा येथे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोषकुमार यादव, रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे, आमदार टेकचंद सावरकर, आशिष जयस्वाल, सुधाकर कुंभारे उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी गडकरी यांनी पार्कमधील फूड कोर्टचे उद्घाटन केले आणि अधिकाऱ्यांसह बर्ड पार्कची पाहणी केली. बर्ड पार्कमधील महत्त्व सांगताना गडकरी म्हणाले की, पार्कमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जात असून ऑक्सिजन निर्मिती होते. सध्या येथे बदक आणि इतर पक्षी आहेत, परंतु फळझाडांची लागवड केल्याने स्थलांतरित पक्षीही येथे येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मिती सोबतच पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. वणी-वरोरा मार्गावर पर्यावरण पूरक क्रॅश बॅरियरची बांधणी, रस्ते निर्मितीमध्ये मुनिसिपल वेस्टचा वापर, तलाव खोलीकरणातून मिळणाऱ्या मातीचा वापर करून जलसंवर्धन, अशा अनेक उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
ऑक्सिजन बर्ड पार्क हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जामठा येथे उभारण्यात आले आहे. हे उद्यान ८.२३ हेक्टर क्षेत्रात विस्तारले असून, पर्यावरणीय शाश्वतता आणि करमणुकीचा मेळ साधणारे ठिकाण म्हणून विकसित केले गेले आहे. फूडकोर्ट आणि जलसंवर्धनाकरिता ३० वॉटर रिचार्ज पीटसुद्धा यामध्ये आहेत.