देवयानी विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का; ख्रिसमस पार्टीतील हिंसाचारानंतर पोलिसांची कडक कारवाई
नागपूर शहरातील वर्धा रोडवरील प्रसिद्ध डाबो क्लब अँड किचनवर पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. ख्रिसमस पार्टीदरम्यान झालेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा क्लब आजपासून थेट 45 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे देवयानी विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शहरातील उच्चभ्रू नाईटलाइफशी संबंधित असलेला हा क्लब आधीपासूनच चर्चेत होता. मात्र आता थेट बंदीची कारवाई झाल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबरच्या पहाटे एका मुलीचा मोबाईल नंबर मागण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद पाहता पाहता हिंसक झाला आणि त्याचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस उपायुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत डाबो क्लब अँड किचन 45 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. “सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ नये” या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे नागपूरमधील क्लब संस्कृती, सुरक्षा व्यवस्था आणि परवान्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपास आणि संभाव्य कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




