नागपुरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘व्हीआयपी पेड पास’ची नवी जमात – भक्तांचा रोष

५० ते ५०० रुपयांच्या पासमुळे सामान्य भक्तांवर आर्थिक भार; सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशालाच तडा?

सविस्तर वार्ता

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ‘राज्य सण’ म्हणून जाहीर केलेला आहे. यामुळे विदर्भासह नागपूर शहरात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नागपूरमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची परंपरा जुनी असून, दरवर्षी असंख्य मंडळे भव्य देखावे आणि आकर्षक सजावट करून भक्तांना दर्शनासाठी आमंत्रित करतात.

गेल्या काही वर्षांत या उत्सवामध्ये बँका, कंपन्या, बिल्डर्स आणि जाहिरातदार मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, त्यातून मंडळांना आर्थिक देणग्या मिळतात. परिणामी हा उत्सव अधिकच भव्य होत चालला आहे.

मात्र यंदा काहीसा वेगळा प्रकार पाहायला मिळतो आहे. मोठ्या देखाव्यांमुळे तासन्तास रांगेत थांबण्याचा त्रास होत असल्याने काही मंडळांनी “व्हीआयपी पेड पास” ही नवी संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये ५० रुपये ते ३०० रुपये (काही ठिकाणी ५०० रुपये पर्यंत) प्रति व्यक्ती असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

🔹 उदाहरणार्थ :

  • दक्षिण-पश्चिम नागपूरातील प्रतापनगर येथील एका मंडळात पासचे दर ३०० ते ५०० रुपये आहेत.
  • तर उत्तर नागपूरातील मकोसबाग, मंगळवारी, जरीपटका परिसरातील मंडळे ५० ते १०० रुपये आकारत आहेत.

सामान्य कुटुंबासाठी ही व्यवस्था आर्थिक ओझे ठरते आहे. उदाहरणार्थ, एका कुटुंबात ४ व्यक्ती असतील, तर ५० रुपये पासानुसार १ मंडळासाठी २०० रुपये खर्च येतो. जर त्यांनी १० गणेश मंडळांचे दर्शन घ्यायचे ठरवले, तर जवळपास २,००० रुपये खर्च करावे लागतात. हे बऱ्याच कुटुंबांना परवडणारे नाही.

आधीच बेरोजगारी, महागाई अशा समस्या असताना, भक्तांना दिलासा देणाऱ्या या उत्सवात “पेड पास” नावाचे नवीन आर्थिक ओझे येणे नागरिकांना त्रासदायक ठरले आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांचा सवाल

“पहिलेच आम्ही व्हीआयपी संस्कृतीमुळे त्रस्त आहोत, त्यात आता गणेश मंडळांनीही पैसे कमावण्याचे नवे साधन सुरू करणे म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशालाच हरताळ फासणे आहे,” असे मत वैभव पटले या नागरिकाने मांडले.

स्मिता देशमुख (गृहिणी, प्रतापनगर)
“गणपती बाप्पा म्हणजे सर्वांसाठी. आता दर्शनासाठीही पैसे द्यावे लागतात हे ऐकून धक्का बसला. छोट्या मुलांना घेऊन रांगेत उभे राहणे अवघड जाते, पण त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणे अजिबात योग्य नाही.”

राहुल मोरे (विद्यार्थी, जरीपटका)
“महागाई आणि बेरोजगारीमुळे आधीच तरुणांचा कंबरडे मोडला आहे. त्यात दर्शनासाठी पैसे मोजावे लागणे म्हणजे भक्तीपेक्षा व्यावसायिकता मोठी झाली असेच वाटते.”

सुनिता ठाकरे (जेष्ठ नागरिक, मंगळवारी पेठ)
“सार्वजनिक गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणजे सर्वांसाठी समान प्रवेश. व्हीआयपी पासच्या नावाखाली श्रीमंत-गरीब असा भेद करणे म्हणजे बाप्पाच्या समोरही माणसांमध्ये भिंत उभारणे होय.”

प्रशासनाची भूमिका काय?

या “व्हीआयपी पेड पास” संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नागपूर महानगरपालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.