“मराठीत एफआयआर? मग बँकेत अर्ज नाही!” — यूनियन बँकेच्या भूमिकेवर संताप

यूनियन बँक ऑफ इंडियाची मराठी एफआयआर नाकारण्याची भूमिका; मनसेने आंदोलन करत बँकेच्या भूमिकेचा निषेध केला

नागपूर – अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना, केवळ एफआयआर मराठीत असल्याने राष्ट्रीयकृत यूनियन बँकेने कागदपत्रं नाकारल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. संबंधित प्रकरणात मनसेने बँकेविरोधात आंदोलन करत ही वागणूक राज्यभाषेचा अवमान असल्याचे म्हटले आहे.

८ जून रोजी योगेश बोपचे या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. विमा नसल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी त्याचा लहान भाऊ लोकेश बोपचेने यूनियन बँकेचा संपर्क घेतला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर मराठीत असल्याने तो दस्तऐवज मान्य नसल्याचे सांगितले. इंग्रजी अथवा हिंदी अनुवाद करून तो नोटराईज्ड आणण्याची सक्ती करण्यात आली.

"मराठीत एफआयआर? मग बँकेत अर्ज नाही!" — यूनियन बँकेच्या भूमिकेवर संताप

दोन आठवड्यांपासून लोकेशला बँकेच्या सेमिनरी हिल्स शाखा आणि पोलिस स्टेशनच्या फेर्या माराव्या लागत आहेत. बँकेच्या भूमिकेमुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया खोळंबली असून, विमा कंपनीकडून क्लेम नाकारला जाईल, असा इशारा बँकेने दिला आहे.

मनसेने याला भाषिक अन्याय ठरवत आंदोलन छेडले असून, ही बाब फक्त नागपूरपुरती मर्यादित नसून राज्यभरातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचे प्रतिबिंब असल्याचे सांगण्यात येत आहे.