ऑनलाइन बुकींग घोटाळ्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; व्यावसायिक वर्तुळात खळबळ
चंद्रपूर : चंद्रपुरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक तथा एका साप्ताहिकाचे संपादक विनोदसिंह उर्फ बबलु ठाकुर यांच्या घर आणि विविध प्रतिष्ठाणांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी भल्या सकाळी छापे टाकले. ईडीच्या या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वृत्तलिहिपर्यंत कारवाई सुरूच होती.
विनोदसिंह ठाकुर हे चंद्रपुरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मालकीचे हॉटेल, रेस्टारंट, पेट्रोलपंप तसेच इतर काही व्यवसाय आहेत. बुधवारी सकाळी ईडीच्या सात पथकांनी ठाकुर यांच्या गुरूद्वारासमोरील घरी, स्वाद रेस्टारंट, स्वाद बार ॲण्ड रेस्टारंट, जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोलपंप, सपना टॉकीजजवळील घर तसेच गणपती हॉटेल आदी ठिकाणी एकाच वेळी छापा घातला. या छाप्यात ईडीच्या पथकाला बेहीशोबी मालमत्ता संबंधीचे कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी उशिरापर्यंत ईडीची कारवाई सुरू होती. या कारवाई संबंधाने ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकींगच्या नावाखाली १२ कोटींहून अधिकचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विनोदसिंह ठाकुर यांची मुले रोहीत आणि अभिषेक यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली. या गैरव्यवहारप्रकरणी रोहीत आणि अभिषेक या दोघांनाही अटक करण्यात आली होती. गैरव्यवहाराची रक्कम वसुल करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २ लाख ४१ हजार रुपये जमा केले. ३ लाख जमा करायचे होते. परंतु, अद्याप जमा केलेेले नाही. ऑनलाइन बुकींगमध्ये गंडा घातल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची व्याप्ती बघता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत करण्यात यावी, अशी तक्रार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने कारवाई केल्याचे सांगण्यात येते.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकींग घोटाळ्यात वनविभागातील काही मोठे अधिकारी सुद्धा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या कारवाईनंतर आता वनविभागातील अधिकाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणले आहेत. ईडीची चंद्रपुरातील ही पहिलीच कारवाई असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.


