म्यानमारमधून थेट पुण्यात घुसखोरी, ८०,००० रुपयांत विकत घेतली जागा, पोलिसांनाही चकवलं
पुणे – म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांनी थेट पुण्यात येऊन बेकायदेशीर वास्तव्य करत भारतीय ओळख मिळवली आहे. ५०० रुपयांत बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड आणि त्यातून भारतीय पासपोर्ट मिळवून रोहिंग्याने भारतीय नागरिक असल्याचा मुखवटा घातला. पोलिस तपासात उघड झालेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
खानचा पुण्यात घर उभारण्यापर्यंतचा प्रवास
मुजम्मिल मोहम्मद अमीन खान (४३) हा म्यानमारमधून स्थलांतरित रोहिंग्या पुण्यात येऊन देहू रोड परिसरात स्थायिक झाला. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय आधार कार्ड मिळवले आणि त्यातून स्वतःसाठी व पत्नी शफीका हिच्यासाठी भारतीय पासपोर्ट तयार केला. त्याने स्थानिक बाजारातून ८०,००० रुपयांना मोकळी जागा खरेदी केली आणि तिच्यावर घर बांधल. मात्र, यासाठी कोणत्याही सरकारी नोंदी तयार केल्या नाहीत.
५०० रुपयांत बनले बनावट आधार कार्ड
तपासात उघड झाले की, खानने भिवंडी येथील एका एजंटच्या मदतीने फक्त ५०० रुपयांत आधार कार्ड मिळवले. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला. हे आधार कार्ड पुढे त्याच्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरले गेले.
पोलिसांना संशय आणि पुढील कारवाई
जुलै २०२४ मध्ये पोलिसांनी खानसह आणखी तीन रोहिंग्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घरातून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, बांगलादेशी चलन आणि म्यानमारची ओळखपत्रे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानने “मौलाना कोर्स” पूर्ण केला असून तो बेकायदेशीर मार्गाने २०१३ मध्ये भारतात दाखल झाला.
काळजीत टाकणारी वस्तुस्थिती
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भारतीय पासपोर्ट तयार झाल्याचे उघड केले आहे. पोलिसांनी सुमारे ६५ पासपोर्ट गोव्यातील आणि पुण्यातील कार्यालयांमधून रद्द करण्याची शिफारस केली आहे.
या प्रकरणामुळे म्यानमार आणि बांगलादेशातून बेकायदेशीर स्थलांतर करून भारतात घुसणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हालचालींवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.