काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारातील मांसाहार पार्टीत घातपात कि अपघात?

वरोरा: प्रचाराच्या थरारात मांसाहारी पार्टीचा घातक परिणाम – एका कार्यकर्त्याचा मृत्यू, शंका व तर्कवितर्क सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत एक गंभीर अपघात घडला. प्रचाराच्या जोशात दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले, ज्यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला बचाव कार्याने वाचवले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित पार्टीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांचा तोल गेला, आणि ते जवळच असलेल्या विहिरीत पडले. फतेहपूर येथील गिट्टी क्रशर परिसरात मटण-चिकन पार्टीचे आयोजन करणाऱ्या प्रमोद मगरे यांच्या कार्यकमात ही घटना घडली. पार्टी दरम्यान मद्यपान करणारे दोघे कार्यकर्ते अंधारात एकमेकांना साथ देत असताना अचानक विहिरीत पडले.

अरुण महाले यांची वेळीच सुटका करण्यात आली, पण गजानन काळे हे विहिरीत पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले, पण अंधारामुळे मृत शरीर उचलता आले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला गेला.

घटनेमुळे प्रचारावर गालबोट लागले असून, शंका उपस्थित केली जात आहे की हे एक अपघात होते किंवा कोणीतरी त्यांना धक्का दिला. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वाव मिळाला आहे.