सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण

नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत तेंडुलकर आणि गडकरी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार झालेल्या देशातील पहिल्या बर्ड पार्कची विशेष चर्चा झाली. गडकरींनी तेंडुलकर यांना या बर्ड पार्कची वैशिष्ट्ये सांगितली आणि नागपूरमधील या अद्वितीय उद्यानाला भेट देण्याचा सल्ला दिला.

निसर्गाशी जवळीक साधणारे बर्ड पार्क
नागपूरच्या जामठा परिसरात आठ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या बर्ड पार्कमध्ये विविध प्रकारच्या फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही फळे केवळ पक्ष्यांसाठी आहेत. नागरिकांना ती फळे खाण्यासाठी उपलब्ध नाहीत. पार्कमध्ये पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी सायकल ट्रॅक, हिरव्यागार जागा, आणि तलावदेखील आहे. तलावामध्ये विविध प्रकारची कमळे व वॉटर लिली आहेत, ज्यामुळे पाणथळ पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास मिळतो.

पक्ष्यांचे आकर्षण केंद्र
गडकरी यांनी सांगितले की, या बर्ड पार्कमुळे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. पामची झाडे, कमळे, आणि अन्य झाडांची लागवड या ठिकाणी पक्ष्यांसाठी घरटे बांधण्यासाठी उपयुक्त आहे. हॉर्नबिल्स आणि विणकर पक्ष्यांसारख्या प्रजातींना हे पार्क विशेष आकर्षण ठरणार आहे. गडकरींच्या मते, ताडोबा अभयारण्यात जाणारे पर्यटक नागपूरच्या बर्ड पार्कला नक्कीच भेट देतील.

तेंडुलकरांना गडकरींचा सल्ला
ताडोबा अभयारण्यात जाण्यासाठी आलेल्या तेंडुलकर कुटुंबाने गडकरी यांच्या या बर्ड पार्कची माहिती ऐकून कौतुक केले. गडकरींनी तेंडुलकरांना खास सल्ला दिला की, ताडोबाला जाण्याआधी या अद्वितीय बर्ड पार्कला नक्की भेट द्या.