गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार / सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
चंद्रपूर : अयोध्या येथील निर्माणाधिन राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या वतीने पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’चा ११ अक्षरी जयघोष लिहीला जाणार असून, या विश्वविक्रमाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राम मंदिराचे निर्माण सुरू आहे. जागतिक दर्जाच्या या भव्यदिव्य मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त देशभरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातसुद्धा २० ते २२ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमासाठी तयारी केली जात आहे. २० जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राऊंडवर पणत्या उजळण्यात येतील. त्या ठिकाणी पणत्याच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष लिहिला जाणार असून, या विश्वविक्रमाची गिनीस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. लंडन येथील गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे. आणि त्याला मान्यतासुद्धा मिळाली आहे. या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडच्या कार्यालयाची चमू चंद्रपुरात दाखल झाली असल्याची सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच स्वत:चे वेगळेपण जपले आहे. अयोध्येतील राममंदिराशी भावनिक नाते आहे. या मंदिराच्या गर्भगृहासाठी वापरत असलेले सागवान लाकूड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या वनक्षेत्रातून पाठविण्यात आले. २९ मार्च २०२३ रोजी ३ हजार क्युबिक फूट सागवान लाकूड भव्य शोभायात्रेसह अयोध्येला पाठविण्यात आले. चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाने ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष पणत्याच्या सहाय्याने लिहिण्याचा आगळा-वेगळा उपक्रम घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जवळपास २०० अवघड नियमांची पूर्तता करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला तर जगातील १८० हून अधिक देशात कार्यरत असलेल्या गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. यासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाकडून २१ आणि २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारीला महाभारतातील ‘दुर्योधन’ पुणीत इस्सर यांच्या या रामायण नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. आणि २२ जानेवारीला सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे हे जवळपास २०० कलाकारांना घेऊन रामायणासंबंधी सादरीकरण करतील. कार्यक्रमाची सुरुवात पाळणा गिताने करण्यात येईल. याच कार्यक्रमात विख्यात महिला तबलावादक अनुराधा पॉल व त्यांच्या चमूचे गीत सादरीकरण होणार आहे. तसेच ‘फायर शो’चे सुद्धा आयोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि राहुल पावडे उपस्थित होते.
चौकट…
ताडोबाच्या झरी जंगलात ८ गिधाडे सोडणार
रामायणात ‘जटायु’चे (गिधाडे) महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. महाराष्ट्रात ५०० पेक्षा कमी गिधाडे आहेत. अयोध्या येथील निर्माणाधिन राममंदिरात प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या झरी जंगलात २१ जानेवारी दुपारी २ वाजता ८ जटायु सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानमधून हे जटायु आणले जातील. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या संबंधात आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहे. तसेच झरीच्या जंगलात जटायु सोडण्यासाठी लागणारी परवानगीसुद्धा घेण्यात आली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.