राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पारितोषिकावरून नवा वाद

चंद्रपूर केंद्राला ८ तर इतर सर्व केंद्रांना प्रत्येकी १० पारितोषिके

चंद्रपूर : ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेची प्रथम फेरी महिनाभरापूर्वी पार पडली. चंद्रपूर केंद्रावर १८ नाटके सादर करण्यात आली. चंद्रपूर वगळता सर्व केंद्रांना १० प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली. मात्र, चंद्रपूर केंद्राला ८ पारितोषिके देण्यात आली. दोन वर्षांपासून २ पारितोषिके गायब करण्यात आल्याने स्थानिक नाट्य कलावंत आणि दिग्दर्शकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात २ प्रोत्साहनपर पारितोषिके कमी देण्यात आल्याने नवा वाद  निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. 

महाराष्ट्र राज्यात हौशी नाट्यस्पर्धेची प्रथम फेरी २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत पार पडली आणि या स्पर्धेचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. चंद्रपूर केंद्रावरून १८ नाटके सादर करण्यात आली. यात ‘द कॉन्शस, यक्षप्रश्न, सदूचे लग्न, कशात काय लफड्यात पाय, चेतना चिंतामणीचे गाव मैत्र जीवांचे, अंधाधुंद, रूपायन, छूमंतर, जेन्डर ॲन आयडेंटीटी, ग्रीष्मदाह, लाडू, अजूनही चांदरात आहे, द फिअर फॅक्टर, बॅलन्सशीट, काळ्या दगडावरची रेघ, गगनभेद, अशी पाखरे येती’ आदी नाटकांचा समावेश आहे. ११ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर केला. युवा शहीद बहुउद्देशीय संस्थेच्या ‘अशी पाखरे येती’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक प्रशांत कक्कड (जेन्डर ॲन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक डॉ. प्रमोद काटकर (द फिअर फॅक्टर), प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक मिथून मित्र (जेन्डर ॲन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक वृषभ धापोडकर (द फिअर  फॅक्टर), नेपथ्यचे प्रथम पारितोषिक तन्वी इंगळे (द फिअर  फॅक्टर), द्वितीय पारितोषिक सुशांत भांडारकर (जेन्डर ॲन आयडेंटीटी), रंगभूषेचे प्रथम पारितोषिक शुभदा कक्कड (जेन्डर ॲन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक मुक्तरंग सोनटक्के (रूपायन), उकृष्ट अभिनय रौप्यपदक प्रशांत मडपूवार व कल्याणी भट्टी (जेन्डर ॲन आयडेंटीटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अपूर्वा खनगन  (अजूनही चांद रात आहे), विशाखा देशपांडे (अशी पाखरे येती), नूतन धवने (लाडू), सुमेधा श्रीरामे (द फिअर फॅक्टर), तुषार  सहारे (अशी पाखरे येती), मकरंद परदेशी (द फिअर फॅक्टर), शंकर लोडे (अंधाधुंद), प्रजेश घडसे (काळ्या दगडावरची रेघ) यांना मिळाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अभियानासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र प्रथम फेरी झालेल्या सर्व केंद्रांवर पुरुषांना पाच आणि महिलांना पाच देण्याचा नियम आहे. मात्र, चंद्रपूर केंद्राला गेल्यावर्षी पुरुष गटात ४ आणि महिला गटाला ४ प्रमाणपत्र देण्यात आली. यावर्षीसुद्धा २ प्रमाणपत्रे मिळाली नाही. सलग २ वर्षे असा प्रकार झाल्याने नाट्यकलावंत आणि दिग्दर्शकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षकांकडून हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला की अनावधानाने झाला, हे कळायला मार्ग नाही. यापूर्वी चंद्रपूर केंद्राने चांगली पारितोषिके मिळविली. दोन वर्षात असे काय झाले की, हौशी कलावंतांकडून परिक्षकांना अपेक्षित असलेली नाटके सादर होत नाही. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वर्षभर तालिम केली जाते. नाट्य कलावंत आणि दिग्दर्शक जीव टाकून मेहनत घेत असताना स्पर्धेत मात्र नाटके टिकत नाही की टिकवली जात नाही, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहे. मुनगंटीवारांच्या गृहजिल्ह्यात गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्यात झालेला घोळ बराच संशयास्पद असल्याचा आरोप नाट्यकलावंत आणि दिग्दर्शकांकडून केला जात आहे. या स्पर्धेमध्ये चंद्रपुरातील ८, यवतमाळमधील ७, वणी येथील २ आणि वर्धा येथील एक नाटक सादर करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुहास जोशी (पिंपरी-चिंचवड), प्रतिभा पाटील (मुंबई) आणि संजय दखने (अमरावती) यांनी काम पाहिले. मुंबई-पुण्यातील परीक्षकांकडून चंद्रपूरवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे, अजय धवने, नाट्यदिग्दर्शक संजय  रामटेके आदींनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे.

राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पारितोषिकावरून नवा वाद

चौकट…

नाटकांचा दर्जा चांगला नव्हता : प्रतिभा पाटील

राज्य नाट्य स्पर्धेला एक क्वॉलिटी असते. चंद्रपूर केंद्रावरून सादर करण्यात आलेल्या अनेक नाटकांचा दर्जा अजिबात चांगला नव्हता. अनेक नाटके प्रॉम्टींगवर झाली. नाट्यकलावंतांना पाठांतर नव्हते, हे परीक्षकांना आणि उपस्थित रसिक-दिग्दर्शकांनासुद्धा स्पष्टपणे दिसत होते. सर्वांना नाटक कळते. त्यामुळे प्रॉम्टींगवर नाटके केली जात नाही. कलाकारांऐवजी प्रॉम्टींगचा आवाज अधिक येत होता. आम्ही सर्व नाटके सर्वांगाने बघितली. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यांची नाटके होतात, त्या सर्वांनी सर्व नाटके पूर्ण बघावी. तेव्हाच आपला दर्जा काय, हे दिसून येईल. नाटक सादर झाल्यानंतर तिनही परीक्षकांमध्ये रोज चर्चा होत होती. त्यावरूनच प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. चंद्रपूर केंद्र त्यात काहीसे कमी पडले, असे या केंद्रावरील परीक्षक प्रतिभा पाटील यांनी सांगितले.