पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार
चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व दिल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्या येथील नवनिर्माणाधिन राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. निवडणुकीत लाभ उठविण्यासाठी भाजपाने चंद्रपुरातील विश्वविक्रमी उपक्रमात पहिल्या सहा पणती लावण्याचा मान वाल्मिकी समाज, केवट-भोई समाज, मुस्लिम समाज, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शिख समाजाच्या महिलांना देण्यात आला आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आगामी निवडणुकीत २०१९ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि मित्र पक्षाने कंबर कसली आहे. ‘मोदीची गॅरंटी’ असा हाशटॅग तयार करण्यात आला आहे. अवघ्या तीन महिन्यांवर लोकसभेची निवडणूक असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथील नवनिर्माणाधिन राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात दीपोत्सवासारखा केला जाईल. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात एक विश्वविक्रम केला जाणार आहे. २० जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राऊंडवर सुमारे ३० हजार पणत्या लावून ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष लिहला जाईल. या उपक्रमाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदसुद्धा केली जाणार आहे. हा इव्हेंट भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणुकीत या उपक्रमाचा कसा फायदा करून घेता येईल, याचे नियोजन भारतीय जनता पक्षाने सोयीस्कररित्या केल्याचे दिसते.

३० हजार पणत्या लावताना पहिल्या सहा पणत्या लावण्याचा मान विविध समाजातील महिलांना देण्यात आला आहे. पहिली पणती वाल्मिकी समाजाच्या शशी लखन सरवाण यांच्या हस्ते लावली जाईल. दुसरी पणती केवट -भाई समाजाच्या आशा दाते, तिसरी पणती मुस्लिम समाजाच्या चाँद पाशा सय्यद, चवथी पणती बौद्ध समाजाच्या प्रियंका थूल, पाचवी पणती आदिवासी समाजाच्या गीता गेडाम आणि सहावी पणती शिख समाजाच्या बलजीत कौर बसरा यांच्या हस्ते लावली जाईल. त्यानंतर जवळपास १२०० विविध समाजातील कार्यकर्ते ३० हजार पणत्या लावतील. एका पणतीत दोन वाती ठेवल्या जातील. पणत्या कशा लावायच्या, याचे प्रशिक्षण देण्यासाठी सोमवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अभ्यासवर्गसुद्धा घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी ६०० महिला भगव्या रंगाच्या साड्या परिधान करतील. तसेच ६०० पुरुष जय श्रीराम लिहिलेली भगव्या रंगाची टी-शर्ट घालणार आहेत. १८ जानेवारीला साड्या आणि टी-शर्टचे वाटप केले जाणार असल्याचे सुत्राने सांगितले.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपाला दारूण पराभव पत्करावा लागला. हंसराज अहीर यांच्यासारख्या भाजपाच्या दिग्गज नेत्याला नवख्या उमेदवाराने पराभूत केले. याचे शल्य भाजपाला आहे. हंसराज अहीर हे या पराभवाची कारणमिमांसा सतत करत असतात. लोकसभेतील पराभवामुळे भाजपाच्या काही नेत्यांना अनेक अडचणींना सामोरेसुद्धा जावे लागले. काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राज्यातील लोकसभेची एकमेव जागा जिंकली. तसे सोशल इंजिनिअरिंग भाजपाला त्यावेळी करता आले नाही. पण, आता वेळीच सावधान होऊन भाजपाकडून पत्ते ओपन केले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कसर राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आगामी दिवसात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात एक-एक समाज जोडण्याचा प्रयन सुरू आहे. पणत्या उजळण्याचा उपक्रमातील सोशल इंजिनिअरिंग भाजपाला येणाऱ्या काळात किती फायदेशीर ठरणार, याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.